लोकमान्य ते महात्मा

ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचा लोकमान्य ते महात्मा हा महाग्रंथ अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. टिळक ते गांधी या स्थित्यंतराचा महाराष्ट्राच्या संदर्भातला वेध त्यांनी यात घेतला आहे. या टप्प्यातला प्रबोधनकारांचा महाराष्ट्रावरचा प्रभाव निर्विवाद आहे. तरीही त्याकडे सर्वसाधारणपणे दुर्लक्ष केले जाते. पण या ग्रंथात ते होत नाही. प्रबोधनकारांविषयी अनेक महत्त्वाची निरीक्षणं यात नोंदली जातात. म्हणून हे या पुस्तकातले वेचे महत्त्वाचे आहेत.

मंडाले येथील तुरुंगात टिळकांना १९१० अखेर ‘गीतारहस्य’ लिहायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे श्लोकार्थविरहित ग्रंथ चार महिन्यांत लिहून झाला. २ मार्च १९१२१ च्या पत्रात तसा उल्लेखच आहे. त्यांनी एप्रिलमध्ये श्लोकार्थही लिहून संपवला.
‘गीतारहस्य’चे लिखाण अशा प्रकारे १९११ मध्येच पूर्ण झाले असले, तरी त्याचे प्रत्यक्ष प्रकाशन मात्र टिळक तुरुंगातून सुटून आल्यानंतरच म्हणजे १९१५ मध्ये झाले. छपाई प्रक्रियेवर टिळकांची जातीने देखरेख होतीच. ‘आर्यभूषण’मध्ये ग्रंथ छापला जात असताना तेथे के. सी. ठाकरे यांच्या वक्तृत्वावरील ग्रंथही छापला जात होता. त्याची पाने टिळकांच्या पाहण्यात आली. योगायोगाने केशवराव ठाकरे तिथेच होते. त्यांची टिळकांनी आस्थापूर्वक चौकशी केली. ते ब्राह्मण असल्याचा त्यांचा समज झाला, तेव्हा आपण कायस्थ असल्याचा खुलासा ठाक-यांनी केला. त्यावर कायस्थांनी याही क्षेत्रात कर्तबगारी दाखवली असल्याचा शेरा टिळकांनी मारला. ‘वक्तृत्व : कला आणि साधना’ हा ‘प्रबोधन’कारांचा ग्रंथ आजही वक्तृत्वावरील महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.

***

‘आमच्या संस्थानातील धर्मपीठावर पिठाधिकारी नेमण्याचा अधिकार छत्रपतींना असतो काय?’ असा सवाल छत्रपतींनी केशवराव ठाक-यांना विचारला. त्यावर केशवरावांनी होकारार्थी उत्तर दिले. छत्रपतींना पुरावा हवा होता. तोही केशवरावांनी दिला. समर्थ रामदासांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी समाधिस्थ झाल्यावर गादीवर कोणी बसायचे, यावर त्यांच्या शिष्यगणांत भाडाभांडी व मारामारी झाली, ही बातमी सातारला छत्रपती (पहिले) शाहू महाराजांकडे जाताच त्यांनी या वादात हस्तक्षेप केला. ज्येष्ठांच्या (समर्थांचे मोठे भाऊ) वंशजांना हजर करून या गादीवर बसायला कोणी तयार आहे का,’ असे विचारले. वंशज तयार नव्हते, असे नाही; पण त्यांना ब्रह्मचर्यव्रताची अडचण वाटली होती. म्हणून ते कां कू करू लागले. महाराजांना अडचण समजली. ते म्हणाले, ‘ठीक आहे. आम्ही ती अडचण दूर करतो. या गादीवरील मठाधिपतीने विवाह केला, तरी चालेल.’ एक मुलगा तयार झाला. त्यास श्रीफल, महावस्त्र अर्पण करून छत्रपतींनी त्याची समर्थांच्या गादीवर अधिपती म्हणून नेमणूक केली आणि ‘आमच्या स्वराज्यातील कोणत्याही धर्मपीठावर अधिपती नेमण्याचे अधिकार छत्रपतींचे आहेत, त्याप्रमाणे चालावे.’ असा लेखी हुकूम जारी केला.
महाराजांनी हा प्रश्न कोणत्या हेतूने विचारला, याचे इंगित ठाक-यांना व दिवाण भास्करराव जाधवांना तेव्हा कळले नाही. पण त्यानंतर वर्षभरात महाराजांनी क्षात्र जगद्गुरुपीठाची स्थापना केली. त्यावर पाटगाव येथील मौनी बाबांच्या पीठाचे सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडीकर यांची क्षत्रिय मराठा जगद्गुरू म्हणून नेमणूक केली. मौनी बाबांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवर निघाले, तेव्हा त्यांना आशीर्वाद दिल्याने पाटगाव मठाचा व भोसल्यांच्या गादीचा संबंध पूर्वीपासून होताच.
बेनाडीकर पाटील हे इंटरपर्यंत शिकलेले तरुण होते. त्यांना क्षात्रजगद्गुरू म्हणून घोषित करताना महाराजांनी कोल्हापूर येथे राजेशाही थाटाचा समारंभ केला. या समारंभास दरम्यानच्या काळात महाराजांपासून दुरावलेले जैन समाजाचे ब्राह्मणेतर नेते अण्णासाहेब लठ्ठे हजर होते. ‘क्षात्रजगद्गुरूंना मराठा उपाध्यायांनी वैदिक मंत्रांनी अभिषेक केल्यानंतर स्वतः अण्णासाहेबांनी सोन्याने मढवलेल्या गव्याच्या शिंगातून क्षात्रजद्गुरूंच्या चरणांवर समंत्रक जलधारांचा निराळा अभिषेक केला.’ असे ठाकरे सांगतात.
उपनिषदांचे कित्येक तत्त्वचिंतक ऋणी क्षत्रिय होते. ब्राह्मणांनाही ब्रह्मज्ञान सांगणारा जनक क्षत्रिय होता. कृष्णाला तर ‘कृष्णं वंदे जगद्गुरू’ असे म्हणत त्याचा गौरव केला जातो. (बुद्ध व महावीर क्षत्रिय असले, तरी ते वैदिक परंपरेबाहेरचे असल्याने त्यांचा विचार येथे नको.) क्षत्रियांचा धर्माधिकार प्रस्थापित करण्यासाठी विश्वामित्राने दिलेला लढा आपणास माहीतच आहे; पण वैदिक परंपरेत एवढी उलथापालथ अद्यापपावेतो कोणी केली नव्हती.
टिळकांनी आणि सनातनी ब्राह्मणांनी शाहू छत्रपतींच्या आणि मराठ्यांच्या अस्मितेला डिवचले. त्याचे पर्यावसान अखेर क्षात्रजद्गुरूपीठात झाले.

संदर्भ प्रकार: