मी पंढरी गिरणगावचा: Page 7 of 7

बाजूला चार-चार तोट्यांची व्यवस्था होती. तिथे माझ्या बायकोला पाणी मिळू न देणे, धुण्याला जागा न देणे, तिच्याकडे बघून आपसात कुजबूज करणे, माझ्या मुलांना घरात न घेणे, अशा गोष्टी घडायला लागल्या. एकीने माझी दुसरी मुलगी बग्गू हिला हाकलून देताना इतक्या बेदरकारपणे ढकलले, की फाटक्या पत्र्यावर आपटून तिचे नाक मधोमध फाटले. ती खूण अद्याप आहे.
तर शिवसेनेत मी मिळवलेली अनमोल वस्तू हीच! जिची किंमत कशानेही व्हायची नाही. त्यांच्याकडून मला प्रेम मिळाले. बाकी पुष्कळांना पदे मिळाली. पैसा, गाड्या, सगळे मिळाले; पण हे ‘गुप्तधन’ मला बहुतेक एकट्याला मिळाले. ते मला त्यांच्या घरात प्रवेश केल्यापासूनच मिळत होते. दादांच्या ‘मठी’तून बाहेर पडायला दुपारी एकपेक्षा जास्त वेळ लागला, की वहिनी लगेच अडवायच्या. ‘‘न खाता पिता चाललात कुठे? रात्री किती वाजता प्रेसमधून निघाला याचा काही नेम आहे? चला दोन घास खा.’’ मी चांगल्या बारा-पंधरा चपात्यांचे ‘घास’ घेऊन बाहेर पडायचो.
दादा कडक होते; पण त्यांचेही प्रेम मला लाभले. १९७०च्या सीमा आंदोलनात साहेब १०० दिवस येरवड्याच्या तुरुंगातच होते. कशामुळे माहीत नाही, पण एक दिवस मला उठताच येईना. सगळे बळच नाहीसे झाले. दादांनी श्रीकांतजींना डॉ. जयंत देशमुखांना घेऊन माझ्या घरी पाठवले. त्यांना दादांची ताकीद होती - ‘शनिवारी पंढरी माझ्यासमोर बसलेला मला हवा.’ अंतर सहा दिवसांचे होते. देशमुख होते होमिओपाथ. त्यांनी कोणती औषधं दिली माहीत नाही; पण शनिवारी मी दादांसमोर होतो.
शेवटी दादांच्याच आदेशाने मी ७२ साली ‘मार्मिक’मधून बाहेर पडलो. कित्येकांचा समज आहे त्याप्रमाणे कशावरून तरी बिनसले म्हणून नव्हे. ती हकिकत वेगळी सांगेन.

संदर्भ प्रकार: