मी पंढरी गिरणगावचा: Page 6 of 7

बघता बघता सारी मुंबई पेटली. बाळासाहेबांना येरवड्याला नेण्यात आले. धरपकड, लाठीमार, गोळीबार यांचे सत्र सर्रास सुरू झाले. घराघरात शिरून शिवसैनिक व त्यांचे नातलग यांना मारहाण, अटक व्हायला लागली. गोळीबाराला तर धरबंदच नव्हता. एलफिन्स्टन पुलाखालच्या घरात एक क्षयरोगी तरुण पलंगाला टेकून बसला होता. त्याच्या पाठीत गोळी शिरली.
परळच्या माधव भुवनच्या तिसऱ्या मजल्यावर (पहिल्या मजल्यावर नटवर्य शंकर घाणेकर राहत) बेळगावच्या ‘तरुण भारत’चे संपादक आणि सीमावासीयांचे नेते बाबूराव ठाकूर यांची नात वीणा सामंत आपल्या १८व्या वाढदिवशी वडिलांना पेढा देत असताना तिच्या मानेत गोळी शिरली. (ती मिळवून मी नंतर तिचा ‘मार्मिक’मध्ये फोटो छापला होता.)
अशा परिस्थितीत ‘मार्मिक’ काढायलाच हवा होता. म्हणजे मला अग्रलेखासाठी वांद्र्याला जायलाच हवे होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी काळाचौकीहून माझ्या घरातून जुने चुरगळेले कपडे घालून फूटपाथच्या कडेकडेने अगदी काळाचौकी पोलीस स्टेशनसमोरून कॉटनग्रीनला गेलो आणि रेल्वेलाइनमधून चालत वांद्र्याला गेलो.
लिहून घ्यायला मी येण्याची शक्यता बहुतेक नाही असे गृहीत धरून प्रबोधनकारांनी टाइपरायटवर अग्रलेख ठोकून काढलाच होता. तरी पण प्रश्न होता, तो प्रभादेवीला प्रेसमध्ये नेऊन कसा द्यायचा? त्यांचा विचार चालला असताना समोरच्या रसत्यातून कोणाकडचा तरी ‘रामा’ (भांडी धुणी करणारा गडी) बाहेर जाता दिसला. बस्स! उपाय सापडला, तो दादांना सांगताच ते तशाही परिस्थितीत हसले.
मी पँटशर्ट काढून तिथे दादांच्या ‘मठी’त गुंडाळून ठेवला. अंगात नुसता चड्डी-गंजीफ्रॉक उरला. गंजीफ्रॉकला भरपूर भोके होती. फणी घेऊन केस उलटे फिरवले आणि परफेक्ट ‘बाल्या’ दिसायला लागलो. अग्रलेख घडी करून तेल्या कागदात गुंडाळून – गंजी-फ्रॉकच्या आत काखेत दाबून धरला नि निघालो.
गेटपर्यंत आणि बाहेरही पोलीस होतेच; पण ‘बाल्या’ (हे ‘रामा’चे आणखी एक नाव. खरे नाव काही असो.) समजून कोणी अडवले नाही. पण जाण्याचा मार्ग शेवटी माहीमवरूनच. माहीम कॉजवेवर. माहीमपाशी अधूनमधून दगडफेक, गोळीबार असे चाललेच होते. कशामुळे कुणास ठाऊक, पण त्यावेळी सबंध कॉजवेवर एक मोठा चर खणलेला होता. मी आपला त्यात उतरून चालत होतो. एक-दोनदा पोलिसांनी हटकले, पण ‘बाल्या’ म्हणून सोडले. माहीमला मात्र धरलेच. दोन तडाखेही दिले.
एका अधिकाऱ्याने विचारले,
‘‘भडव्या, या गोळीबारातून कुठे मरायला निघालास?’’
‘‘दरगाह पे जा रहा हूं, साब.’’
हे ऐकल्यावर त्याला वाटले मी मुसलमान आहे. दर्ग्यावर फुकट खायला मिळते ते खायला जात असेल. त्याने मला ‘उस तरफ से जाव’ म्हणून एक दांडा मारून हाकलले आणि मी कॅडल रोडवरच्या वाड्यांमधून तडफडत प्रभादेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये प्रेस गाठला.
याच अंकात श्रीकांतजींनीही कमाल केली होती. त्यांनी ठाण्याची निवडणूक जिंकली तेव्हा बाळासाहेबांनी काढलेली वाघीण पुन्हा जत्रेत घेतली. तिच्या डोक्याकडच्या वरच्या बाजूला साहेबांचा फोटो लावून त्यावर तुरुंगासारखे गज काढले आणि वर मथळा दिला, ‘येशील कधी परतून?’
या चित्राने शिवसैनिकांना मोठी हिंमत दिली. ते इतके भडकले, की बाळासाहेबांचे आवाहन प्रसिद्ध होईपर्यंत मुंबई जळतच होती; पण आवाहन येताच नुसती जळायची थांबली नाही, ताबडतोब विझवून शिवसैनिकांनी तिला धुतल्यासारखी स्वच्छ केली.
‘मार्मिक’चा तो अंक सरकारने बेकायदा ठरवून ‘जप्त’ केला. म्हणजे तसे जाहीर केले. पण तो सरकारच्या हाती लागलाच नाही. सगळाच्या सगळा कधी, कसा, कुठे उडून गेला हे सरकारला समजलेच नाही. शिवसैनिकांना मात्र तो मिळाला.
‘मार्मिक’च्या वितरणाचे काम करणारी चंदू सकपाळ, शरद चोचे वगैरे पोरे होतीच तशी बिलंदर!
त्या प्रवासात एखादी चुकार गोळी मला लागली असती तर तो अग्रलेख छापला गेला नसता. कदाचित अंकही निघाला नसता.
त्यामुळे तो आठवणीतून हटत नाही.
असे माझे वृत्तपत्रीय शिक्षण चाललेले असतानाच शिवसनेचे कामही चालत होते. शिवसेनेत मला मुद्दाम दाखल व्हावे लागले नाही. माझे सगळे कुटुंबच शिवसनेत आले. माझ्या खोलीवर भगवा झेंडा लागला म्हणून चाळीतल्या लाल बावटेवाल्या गिरणी कामगार बायका आमच्याकडे बघून थुंकत. कित्येक वर्षांचे शेजारधर्माचे संबंध फाटले. भलसलत्या प्रतिक्रिया व्हायला लागल्या. तेव्हा सगळ्या आठ चाळींसाठी प्रत्येक दोन चाळींच्यामध्ये मागच्या

संदर्भ प्रकार: