मी पंढरी गिरणगावचा: Page 5 of 7

त्याचे संस्कार माझ्यावर होत राहिले.
ते स्वतः कमालीचे वक्तशीर होते. सकाळी ९ ला म्हणजे ९ला ते अग्रलेख, घाव घाली निशाणी, वगैरे सांगायला तयार असत. लेखाची सबंध मांडणी त्यांच्या मनात तयार असे. सांगायला लागले, की शेवटच्या पूर्ण विरामापर्यंत थेट. बोलण्याची फेक अशी, की ऱ्हस्वदीर्घ, विराम चिन्हे आपोआप कळावीत. मधे काही आठवण्यासाठी थांबणे, योग्य शब्दासाठी चाचपडणे, काही नाही, सगळा लेख डोक्यात तयार पाहिजे. तीच तालीम मला मिळत गेली. त्यामुळेच मी कोणताही लेख प्रारंभापासून शेवटापर्यंत ४० ओळी असो की ४००, खाडाखोड न करता लिहू शकलो. अंक वेळेवर म्हणजे वेळेवर निघालाच पाहिजे, त्यासाठी काहीही करायला लागले तरी करायचे, कारण वृत्तपत्र व्यवसाय हे काम नसून कर्तव्य आहे हे त्यांच्या स्वतःच्या आचरणातून माझ्या अंगात कसे भिनले हे एका प्रसंगातून प्रकट करीत आहे. त्यासाठी ‘मार्मिक’च्या ४७व्या वर्धापन दिन विशेषांकात छापलेला लेखच इथे जसाच्या तसा देत आहे.
‘मार्मिक’मध्ये आणि वृत्तपत्रे व्यवसायात माझा प्रवेश एकदमच झाला. ‘मार्मिक’च्या सेवेचा पहिला टप्पा ७२ सालापर्यंतचा. म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा. त्यानंतर दादांनी (प्रबोधनकार) मला ‘विश्व’ विद्यालयात उच्च शिक्षणासाठी पाठवले. दुसरा टप्पा ९१ साली सुरू झाला. तो आजतागायत चालू आहे. या अवधीत एकूण किती ‘मार्मिक’ काढण्यात मी सहभागी झालो हे सांगता येणे अशक्य आहे.
पण इतक्या सगळ्या अंकांमध्ये माझ्या कायम लक्षात राहिला तो १९७०च्या सीमा आंदोलनाच्या ऐन रणधुमाळीत काढलेला अंक. त्यातल्या संपादकीय लेखाचा मथळा होता :
‘म्हैसूरला भात आणि महाराष्ट्राला लाथ’
बाळासाहेबांना प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली सरकारने अटक केल्यामुळे साहजिकच प्रबोधनकारांनी लिहिलेला अग्रलेख म्हणजे धगधगता वणवाच होता.
तो ‘मातोश्री’वरून म्हणजे वांद्र्यावरून प्रभादेवीला मी कशा परिस्थितीत आणला ते आठवले, की आजही अंगावर शहारे उठतात.
तो सगळा प्रसंगच भयंकर होता.
८ फेब्रुवारीच्या सकाळी उपपंतप्रधान मोरारजी देसाईने शिवसेनेचे सीमाभागाविषयीचे निवेदन स्वीकारण्याचे कबूल केले म्हणून ते घेऊन मनोहर जोशी वगैरे माहीमच्या बस डेपोजवळ उभे होते; आणि ते पाहण्यासाठी असंख्य शिवसैनिक जमले होते.
मोरारजी येणार, निवेदन घेणार आणि सरळ लेडी जमशेदजी रोडने जाणार अशी अपेक्षा होती. पोलिसांनी तो मार्ग मोकळा ठेवला होता.
पण मोरारजींची गाडी थांबण्याचे लक्षणच नाही असे पाहिल्यावर सगळीकडून शिवसैनिक गाडीवर झपटले. गाडी तशीच फोफावत मोरी रोडला वळली आणि शिवसैनिकांना उडवीत निघून गेली. त्यात ती गिरगावचा शिवसैनिक सत्यवान पेणकर याच्या छातीवरून तर शिवसेनेचा स्वयंभू फोटोग्राफर अशोक करंबेळकर याच्या मांडीवरून गेली. तिथेच भडका उडाला. बाळासाहेबांनी गाडीवर उभे राहून संतप्त भाषण केले. त्यानंतर रानडे रोडच्या घराजवळ पुन्हा भाषण केले. त्यात ‘हा लढा चिरडायला रणगाडे आणावे लागतील,’ असे वाक्य होते. दुपारपर्यंत मामला इतका भडकला, की संपूर्ण संचारबंदीचे १४४ कलम मुंबईभर जारी करण्यात आले. संध्याकाळी दत्ताजी साळवींनी भोईवाडा मैदानात १४४ कलम तोडण्याचा निर्धार केला. त्यांचा उचलण्यात आले. त्यानंतर वणवा आणखी भडकला. त्यावेळी पोलिसांना टाटा हॉस्पिटलकडून बाहेर पडू न देण्याची कामगिरी मी, मामा खानोलकर, त्याचा भाऊ, शरद चोचे, उदय गावकर वगैरे बजावीत होतो. पण पोयबावडीकडून गॅसची नळकांडी येऊ लागल्यावर नाइलाज झाला आणि आम्हांला हाफकिनच्या वसाहतीत गडप व्हावे लागले.
तिथून मागच्या बाजून अनेक भिंती पार करून वाडिया ह़स्पिटलकडून सूर्य टॉकिजकडे आणि मग फाळके रस्त्याने दादर पुलावरून श्रीकांतजींकडे आलो. या पळापळीत मामाने एक आणि मी एक अशी दोन गॅसची नळकांडी जमिनीवर आपटून फुटण्याच्या आत उचलून पळवली आणि रानडे रोडच्या घराजवळ गटारात लपवली. पुढे सरकारने स्वदेशी गॅस वापरल्याचा दावा केल्हा, तेव्हा तो प्रथम कोरियात वापरलेला अमेरिकन CA आणि CN गॅस होता हे सिद्ध करण्यासाठी त्यांचा उपयोग झाला. त्यांचे फोटो आणि गॅसचा केमिकल फॉर्म्युला, दोन्ही आम्ही ‘मार्मिक’मध्ये छापले होते.
रात्री दत्ताजींना धरून नेल्यानंतर पहाटेस खुद्द बाळासाहेब आणि मनोहर जोशी यांना अटक करण्यात आली आणि त्यांना पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. मग काय?

संदर्भ प्रकार: