मी पंढरी गिरणगावचा: Page 4 of 7

कळण्यासाठी लिहायचं असतं. सोपं लिहावं सानेगुरुजींसारखं. बाळबोध लिहावं बाबूरावांसारखं.’’
बाबूराव म्हणजे आचार्य अत्रे. त्यावेळी अत्रे-ठाकरे वाद चालू असताना दादांनी अत्र्यांबद्दल काढलेले हे उद्गार आहेत. माणसाच्या गुणांचा धडा घ्यावा असे ते सांगत. अत्रेसाहेब वारले त्यावेळी शिवसेनेचे एक नगरसेवक – प्रमुख नगरसेवक, त्यावेळी नेते हा प्रकार नव्हता – दादांजवळ म्हणाला, ‘अत्रे बेकार माणूस, बेवडा.’
दादा भडकले, ‘‘तेवढीच तुमची अक्कल. तुम्हाला त्याचे दोनxवडेच दिसायचे; पण सरस्वती त्याच्या टाळक्यात कैद होती नि जिभेवर नाचत होती हे काय तुम्हाला कळणार भडव्यांनो! अरे, मुकुंदराजापासून नारायण सुर्व्यापर्यंतची सगळी मराठी त्याच्या बगीच्यात फुलपाखरांसारखी वावरत होती. निघा, कळली तुमची अक्कल.’’
अत्रेसाहेबांच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राचे प्रकरण झाले. हताश झालेल्या शिरीषताई मृत्युपत्राच्या फोटो कॉपीज घेऊन दादांना भेटायला आल्या. अत्रे-ठाकरे वाद, शिवसैनिकांनी अत्र्यांची गाडी तोडली होती. त्या पार्श्वभूमीवर त्या आत यायला भीत होत्या. ‘मातोश्री’च्या बाहेरच उभ्या होत्या. मी त्यांना पाहिले नि दादांना सांगितले.
‘‘कोण, नानी? जा ताबडतोब स्वतः नि तिला घेऊन ये. पोरीची वाट लावली लालभाईंनी.’’ दादा ओरडले. (लालभाई म्हणजे कम्युनिस्ट)
शिरीषताईंनी मी घेऊन आलो. ‘‘बस नानी’’ दादांनी त्यांना बसायला सांगितले. मला म्हणाले, ‘‘सरूला जाऊन सांग, चहा कर. नानी आलीय.’’ (सरू म्हणजे सौ. मीना वहिनी – नानी हे शिरीषताईंचे लाडाचे नाव.)
शिरीषताईंची हकिकत ऐकून घेतल्यावर त्यांनी मृत्युपत्र वाचले. त्यात वावगे काही दिसत नव्हते. वावगे एकच वाटत होते, की अत्र्यांनी आपल्या लाडक्या मुलींना वाऱ्यावर सोडावे याचे. पण त्या वाटण्यामुळे मुत्युपत्र बाद ठरत नव्हते. त्यांनी मला हाक मारली आणि शिरीषताईंना म्हटले, ‘‘हा माझा पोलीस. याला काय सापडतं का बघू.’’
माझ्या वाचनातला सर्वात आवडता हिरो शेरलॉक होम्स माझ्या मदतीला धावला. इथे एक रहस्य सांगून टाकतो. बुद्धीला गंज लागायला लागला, की मी शेरलॉक होम्स वाचतो. मन खिन्न झाले, की डिकन्सचे ‘पिक् विक् पेपर्स’ वाचतो. अद्याप हा क्रम चालू आहे.
एक गोष्ट माझ्या लक्षात आली. मृत्युपत्राचा पहिला जो पाठपोठ कागद होता त्यात फक्त मालमत्तेचे वर्णन होते. तिसऱ्या पानाबाबतच संशय होता. कारण त्याच पानात सगळे जनतेला अर्पण केल्याचा, तसेच कॉ. डांगे, वर्दे (महाराष्ट्र बँक) आणि बाळासाहेब देसाई यांचा कारभारी नेमल्याचा उल्लेख होता. तिन्ही पानांवरच्या सह्या अस्सल होत्या. पण तिसऱ्या पानावरच्या मजकुरात वाह्यात शब्दांनी लांबड लावून तो सहीपर्यंत आणल्याचे समजत होते.
म्हणजे हाच कागद भानगडीचा होता. पण नुसती शंका कामाची नव्हती. ठाशीव पुरावा हवा होता. माझे लक्ष त्या पानाच्या वरच्या डाव्या कोपऱ्याकडे गेले. पहिल्या कागदाला हा कागद जोडलेला होता. पण पहिल्या कागदातून टाचणी आरपार गेल्याच्या दोन दोन खुणा बाजूला म्हणजे आगे मागे, फोटो कॉपीत होत्या. तशा दुसऱ्या कागदावर नव्हत्या.
म्हणजे मूळ कागद नष्ट करून दुसरा कागद जोडण्यात आला. त्यावर टाचणीच्या खुणा आल्या नाहीत.
हे मी दादांना सांगितले, त्यांनी त्यावर सणसणीत अग्रलेख लिहिला. त्यात हा मुद्दा स्पष्ट मांडला. तो अंक प्रसिद्ध होताच वर्दे आणि बाळासाहेब देसाई यांनी अंग काढून घेतले. फक्त डांगे उरले. प्रकरण कित्येक वर्षे कोर्टात गेले. अखेर निकाल शिरीषताईंच्या बाजूने झाला. त्यात टाचणीचा मुद्दा कोर्टाने ग्राह्य धरला होता.
सांगायचा मुद्दा असा, की दादांचे मन फार मोठे होते. अत्र्यांबरोबरचा वाद अगदी टोकाला गेला असतानाही, ते निधन पावल्यावर दादा त्यांच्या गुणांना दाद देत होते. त्यांची ‘नानी’ ही दादांचीही ‘नानी’च राहिली. तिच्यासाठी ते भांडले.
आपले प्रत्येक विधान तपासून घेण्यावर त्यांचा मोठाच कटाक्ष होता. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना प्रश्नचिन्हांकित मथळे आवडत नसत. स्वतःलाच जर आपल्या आरोपाबद्दल, विधानाबद्दल संशय अगर शंका असेल तर करू नये असे ते सांगत. १०० खऱ्या विधानांमध्ये १ खोटे किंवा दुबळे असणे म्हणजे खंडीच्या वरणात उंदराची एक लेंडी, असे दादा सांगत. त्यांचे लिहून घेता घेता, माझे वाचून दाखवता दाखवता त्यांचे जे शेरे बाहेर पडत,

संदर्भ प्रकार: