मी पंढरी गिरणगावचा: Page 3 of 7

करीत असे. त्यामुळे तत्कालीन छपाई प्रक्रिया मला अवगत झाली.
तेव्हा टाइप १२ पॉइंट, १४ पॉइंट, १४ पॉ. ब्लॉक म्हणजे जाड, त्यापुढचा वन्हिक, मग २४ पॉ-टू लाइन, थ्री लाइन, फोर लाइन, अनंत मायदेव असे असत. कामाची पद्धत अशी असल्यामुळे माहिती प्रत्यक्ष कामातूनच होत गेली. कधीकधी छापताना मात्रा, वेलांट्या, अनुस्वार उडून अनर्थ होण्याचा संभव असे, त्यामुळे मशीनवर छपाई चालू असताना तासा, दोन तासांनी निदान ठळक टाइप तरी तपासावे लागत. त्यामुळे दिवाळी अंकाच्या काळात तर अहोरात्र प्रेसवरच मुक्काम असे.
येणेप्रमाणे चालले असतानाच निवडणुका अंगावर आल्या. प्रथण ठाणे जिंकले. कृष्ण मेननला दोन वेळा पाडले. त्यावेळी प्रत्येक सभा ही आव्हान सभा असायची. कम्युनिस्टांनी आमच्या सभा होऊ नयेत असे प्रयत्न चालवले होते. स्टेजच्या जवळ माणसे पेरून ठेवायची, हुल्लड करायची, स्टेजकडे धाव घ्यायची; त्यामुळे आम्हाला त्यांना रोखणे, चोपणे वगैरे कामेही करावी लागत. त्यातही वार्ताहराचीही भूमिका करायची. संध्याकाळी किंवा रात्री (बेरात्रीसुद्धा) परत आल्यावर प्रबोधनकार आणि सौ. मीना वहिनी यांना सगळा वृत्तांत ऐकवायचा. दादा म्हणाले तर लिहून छापायचा. असे करता करता वार्ताहरही आपोआप बनलो. बातमी कशी लिहायची हे इतर वर्तमानपत्रांमधले बघून शिकलो. विजय वैद्यही त्यावेळी सोबतीला होता. ‘मार्मिक’मध्ये शिवसेना वाढत गेली तसतसे हे लेखक एकेक गळत गेले. एक दिवस दादांनी त्यांचा लेख संपल्यावर विचारले,
‘‘लिहायला येतं तर स्वतंत्र काही लिहिण्याचा प्रयत्न का करीत नाही? तुम्ही कोकणी लोक बोलण्यात महा हलकट असता. आता हे लोक शिवसेनेविषयी अद्वातद्वा बोलत असतात. त्यांची अंडी-पिल्ली काढण्यासारखं काहीतरी टोचकं, बोचकं लिहून बघ.’’
मी प्रयत्न केला. दादांच्या मनास आला आणि ‘टोच्या’चा जन्म आला. हे नाव मला श्रीकांतजींनी दिले. काय झाले? कडकड्या किंवा बटन चाकू वापरणे धोक्याचे असे. अंगावर सापडला, की पोलिसांकडून चंपी, लॉकअप वगैरे सगळे यायचे, खोट्या केसमध्येही घालायचे. एकदा एक बर्फवाला भय्या आपली बैलगाडी रस्त्यावर सोडून गेला होता. तो बऱ्याच. वेळाने परत आला. (अजूनही भय्या बैलगाडीवरून हॉटेलवाले वगैरेंना बर्फ पुरवतात.) नंतर माझ्या लक्षात आले, की तो रोज असाच जातो. त्याचा बर्फ फोडण्याचा टोच्या तसाच गाडीवर असतो. चांगला हातभर लांब असतो. पुढे चांगले तीक्ष्ण टोक असते. मागे लाकडी मूठ असते. तो मी लंपास केला आणि पँटला आतून अडकवून वापरू लागलो. म्हणजे फक्त अडकवून फिरण्यासाठी नाही. हल्लेखोर विरोधकांना पंक्चर करण्यासाठीदेखील.
शिक्षणाच्या काळात मला अण्णा खांबेटे, दि. वि. तथा बंडू गोखले यांचे खूप मार्गदर्शन मिळाले. अण्णा खांबेटे यांनी मला हेरकथा वगैरे विविध रोचक प्रकारचे लेखन करण्याची नुसती प्रेरणाच दिली नाही, तर त्यासाठी लागणारी पुस्तके कुठे धुंडाळावीत याचे अड्डे कोणकोणत्या ठिकाणी फूटपाथवर आहेत ते देखील सांगितले. युद्धविषयक लेखन करायला मला बंडोपंतांनी उद्युक्त केले. पुढे मी बरीच युद्धविषयक पुस्तके लिहिली. त्याचे श्रेय सर्वस्वी दि. वि. गोखले यांना आहे. त्यांनी मला कित्येक पुस्तकांची नावे सांगितली. ती वाचता वाचता गोडी लागली युद्धविषयात लेखनाची.
असे माझे शिक्षण चालले होते. प्रासंगिक विषयांवरही दादा माझ्याकडून लिहून घ्यायला लागले. दादा अत्यंत कडक शिक्षक होते. शिस्त त्यांना प्राणप्रिय होती. अचूक शब्दयोजनेवर त्यांचा कटाक्ष होता. शब्दबंबाळ आणि दुर्बोध, संस्कृतप्रचुर लिहिणे त्यांना अजिबात आवडत नसे. एकदा मी एक मोठा ‘वैचारिक’ लेख लिहिला. त्याची भाषा विष्णुशास्त्री चिपळूणकरांना शोभली असती. तो वाचल्यावर दादा म्हणाले,
‘‘तुझ्या डोक्यावर पगडी असून तिच्या झिरमिळ्या हलत आहेत आणि तुझ्या छपरी मिशा चहात बुडाल्यामुळे केसांच्या टोकांना थेंब लटकत आहेत असं मला दिसायला लागलंय.’’
मला काही कळेना. मला गांगरलेला पाहून तेच म्हणाले,
‘‘शास्त्रीबुवा, हे मला कळलं, पण तो पलीकडे मामा खानोलकर उभा आहे, त्याला वाचून दाखव. त्याला xx सुद्धा कळणार नाही. लक्षात ठेव, शेताच्या बांधावर बसलेल्या हरबा-शिरपाला वाचून दाखवलं तर समजलं पाहिजे. आपलं पांडित्य दाखवण्यासाठी लिहायचं नसतं. त्यांना

संदर्भ प्रकार: