मी पंढरी गिरणगावचा: Page 2 of 7

प्रेमात पडलो होतो. ‘मार्मिक’मध्ये बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांच्याखेरीज श्रीकांतजींचे सिनेप्रिक्षान, द. पां. खांबेटे तथा अण्णा यांचा सोमाजी गोमाजी कापशे, हेरकथा, नरेंद्र बल्लाळ, वि. ना. कापडी, अनिल नाडकर्णी (फलाटवाले) यांचे विनोदी साहित्य भरपूर; अवघ्या चार आण्यात मिळते असे. या ‘मार्मिक’मधून ‘वाचा आणि स्वस्थ बसा’ या मथळ्याखाली कंपन्यांमधल्या अधिकाराच्या सर्वात जास्त जागा दाक्षिणात्यांनी कशा भरल्या आहेत याच्या याद्या प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि मला जाणवले, की इथे काहीतरी घडणार आहे. होता होता सदराचे नाव ‘वाचा आणि उठा’ असे झाले. तेव्हा खात्रीच झाली, की इथे काहीतरी घडणार. मी ‘मार्मिक’वर जायला सुरुवात केली.
शिवसेनेची स्थापना झाली. मेळावा झाला. तरीपण माझे स्थान सं. म. समितीच्या वेळी होते तेच राहिले. माझ्याही आधीपासून येऊन शिवसेनेच्या विविध जबाबदाऱ्या निभावायला लागलेली मंडळी आत, आम्ही बाहेर-बाहेर अशीच स्थिती होती. सेनेची स्थापना रानडे रोडच्या घरी पुढच्या खोलीत झाली. ते वर्णन मी करीत नाही. पण साली इस्रायल-अरब युद्ध झाले. त्यावेळी परेलहून इस्रायलला गेलेल्या एका व्यक्तीचे पत्र मला आहे. त्यात त्यावेळच्या इस्रायलच्या लोकांच्या कर्तव्यदक्षतेविषयी आणि देशभक्तीविषयी बरीच माहिती होती. कोणत्याही वस्तूचा भाव वाढला नाही अशी सुरुवात होती. त्यावरून मी एक लेख तयार केला आणि ‘मार्मिक’ला पाठवला. तो छापूनही आला होता. ते माझे पहिले लेखन.
हे सगळे चाललेले असतानाच माझे देशमुखसाहेबांकडे जाणे-येणे चालू होतेच. तेदेखील माझ्या घरचे कसे चालले आहे याची खबर घ्यायला घरी येत. असाच एकदा हिच्यासह दादांकडे-त्यांना आम्ही दादाच म्हणायचो, गेलो. थोड्या वेळाने त्यांचा थोरला मुलगा श्याम आला नि म्हणाला,
‘‘चला, येता का?’’
‘‘कुठे?’’
‘‘चला तर, समजेल.’’
एवढ्या संवादानंतर मी त्याच्याबरोबर गेलो. बायको परस्पर घरी गेली.
श्याम मला थेट कदम मॅन्शनमध्ये म्हणजे ‘मार्मिक’, ‘शिवसेना’ यांच्या हेडक्वार्टरमध्ये घेऊन गेला; आणि प्रबोधनकारांसमोर मला उभा करून म्हणाला,
‘‘दादा, हा पंढरीनाथ सावंत. वाचन चिकार आहे. तुम्हाला वाचून दाखवा……’’ त्याचे वाक्य पूर्ण होण्याच्या आत दादांचा प्रश्न आला. नजर माझ्या कपाळाच्या मध्यभागातून आरपार गेली होती.
‘‘इस्रायलवरचा लेख तूच लिहिलास काय?’’
मी घाबरत घाबरत ‘होय’ म्हटले.
‘‘अक्षर स्वतःचंच होतं काय?’’
‘‘हो.’’
‘‘माझ्याकडे येणार काय? लिहून घ्यायला?’’
माझ्या जोक्यात हजार विजा एकदम चमकल्या.
पत्रकार म्हणून आचार्य अत्रे, प्रोबधकार यांना माझी पिढी ग्रेट समजत होती. त्यातलाच एक मला स्वतःकडे बोलावतो! त्यावेळी नेमके काय वाटले आठवत नाही. मी काही उत्तर दिले असल्यास स्मरणात नाही. त्यांचा पुढचा प्रश्न आला.
‘‘कधी येणार?’’
‘‘राजीनामा देतो. पास झाला की लगेच येतो!’’
राजीनामा दिला. त्यात कारणे अशी दिली होती, की तो पासही दोन दिवसांत झाला. तिसऱ्या दिवशी मी दादांकडे आलो, पगार काय देणार हे मी त्यांना विचारले नाही की त्यांनी मला त्याबद्दल विचारले नाही. ते काम पुढे महिना संपल्यावर श्रीकांतजींनी केले. ते म्हणाले, ‘‘मास्तरला म्हणून किती पगार होता तेवढा देईन.’’ पगार होता २३० रुपये, तेवढा सुरू झाला. १९७२ साली दादांच्या आदेशानुसार खरी पत्रकारिता बाहेर पडेपर्यंत तेवढाच होता.
इथून पुढे पत्रकार, पत्रकारिता हे रूळलेले शब्द मी केवळ सोय म्हणून वापरणार आहे, मी पत्रकार नाही, कधीही नव्हतो.
त्याच सुमाराला द. पां. तथा अण्णा खांबेटे ‘मार्मिक’ सोडून गेले असले तरी त्यांचे लेखन चालू होते. काही महिन्यांनी ते बंद झाले. काही महिने रोज सकाळी वांद्र्याला दादांकडे जायचे. त्यांनी सांगायचे, मी लिहून घ्यायचे, दादरला आणून श्रीकांतजींना द्यायचे. त्यांनी टाइप, कॉलम साइज वगैरे लिहून दिल्यावर लेख प्रभादेवीला नेऊन प्रेसमध्ये द्यायचा. तिथे तो हातांनी खिळे जुळवून कंपोज व्हायचा. शंकरराव आणि दत्तू असे दोन बागाव बंधू नि प्रभुलकर ते काम करीत. त्यांनी फॉर्म बांधून दिला, की प्रिंटर धुरी तो मशीनवर चढवीत. नाना सुळे व्यवस्थापनेचे काम बघत. त्यात प्रेस, सर्क्युलेशन, सगळेच असे. जरूर तेव्हा तो म्हातारा माणूस आमच्याबरोबर प्रेसमध्ये झोपायचा. प्रूफरीडिंग माची

संदर्भ प्रकार: