मी पंढरी गिरणगावचा

वक्तृत्व कला आणि साधना या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रबोधनकारांनी ‘माझे शिष्य’ असा गौरव केला तो ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचा. सध्या मार्मिकचे कार्यकारी संपादक असणा-या सावंतांनी ‘मी पंढरी गिरणगावचा’ या आत्मचरित्रपर पुस्तकात प्रबोधनकारांविषयी मनापासून लिहिलं आहे. त्यातलं ‘प्रबोधनकारांच्या तालमीत’ हे महत्त्वाचं प्रकरण.

प्रबोधनकारांच्या तालमीत
माझा वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाचा आणि शिवसेनेमधला काळ यांची स्थिती रेल्वेच्या किंवा ट्रामच्या रुळांसारखी आहे. रूळ समांतर चालतात; पण या दोन गोष्टी इतक्या एकरूप झाल्या होत्या, की त्यांचा जपानच्या अत्याधुनिक रेल्वेसारखा एकच रूळ बनला होता. इथे मी वृत्तपत्रविद्या असा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण मी कधी पत्रकार झालो नाही. पत्रकार म्हणजे स्वतःचे दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक वगैरे स्वतः काढणारा. अलीकडे सगळेच पत्रकार झालेत, पण दुसऱ्याच्या पत्रात संपादक म्हणून काम करणाराही पत्रकार नव्हे. टिळक, अच्युत बळवंत कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, आचार्य अत्रे हे पत्रकार, मुरली शिंगोटेलादेखील न लिहिणारा पत्रकार म्हणायला हरकत नाही. वृत्तपत्रात काम करणारा तो पत्रकार, ही व्याख्या कधी बनली माहीत नाही; पण तिच्य कसोट्या मात्र फारच सैल व्हायला लागल्या आहेत.
या दोन गोष्टी एकत्र कशा आल्या हे सांगण्याआधी मी कम्युनिस्ट विचारांकडून शिवसेनेकडे कसा सरकलो हे सांगायला हवे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १९५७पासून मंगल कलश येईपर्यंत माझा काही थोडा सहभाग होता. पुढाऱ्यांचे चहापाणी सांभाळणे तरी केले होते. काही हाणामाऱ्या केल्या होत्या. पण शेवटी संयुक्त महाराष्ट्र समिती ही एक परस्परांशी न पटणाऱ्या विचारांची बांधलेली मोट होती. तिच्यातील पक्षांचे शेवटचे उद्दिष्ट मुंबईसकट संयुक्त महाराष्ट्र निर्माण करणे हे नव्हते. त्यांचे अंतिम उद्दिष्ट देशाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील सत्ता हस्तगत करणे हे होते. आणि सं. म. आंदोलन हे साधन होते.
कम्युनिस्टांना देशात कम्युनिस्ट सत्ता आणायची होती. समाजवाद्यांना समाजवाद आणायचा होता. सं. मं. काँग्रेसजन समितीला तिकडे नाहीतर इकडे सत्तेत स्थान हवे होते. रिपब्लिकन तेवढ्या नेटाने समितीत आलेच नव्हते. जनसंघाला देशात पंचगव्य हे राष्ट्रीय पेय करायचे होते. थोडक्यात, सगळे क्षितिजाकडे पाहणारे होते. मधल्या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत नव्हत्या. प्रत्येक नागरिकाकडे ते फक्त मतदार म्हणून पाहत होते आणि मतांसाठी चळवळीत येत, राहत अगर जात होते.
महाराष्ट्र होताच त्यांच्यात भांडणे लागली. समाजवाद्यांना चीनच्या आक्रमणाचे आयते निमित्त सापडले. त्यांनी समिती मोडली. त्यानंतर एकटे कम्युनिस्टच सं. म. समिती म्हणून मिरवीत राहिले. भांडणे नव्हती तोवर समितीने एकदा महापालिका काबीज केली. पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर राज्यात सर्वत्र सत्ता काँग्रेसची आली. कारण तोवर समितीच्या घटक पक्षांनी एकमेकांना नागडे करून ठेवले होते. धूर्त काँग्रेस नेत्यांनी याचा फायदा अचूक उठवला.
१ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र झाल्यानंतर त्या महाराष्ट्राचे, त्याच्यासाठी त्याग, प्राणत्यागसुद्धा करणाऱ्या मराठी माणसाचे काय होते याच्याकडे समितीमधल्या कोणत्याच पक्षाचे लक्ष राहिले नाही. केवळ मराठी माणूस, महाराष्ट्र यांचा विचार करणे यांना संकुचित वाटत होते. याचा फारच वाईट परिणाम मराठी माणसावर झाला. त्यातली सुशिक्षित मराठी तरुणांवर झाला. बाहेरून, विशेषतः दक्षिणेकडून येऊन इथे वेगवेगळ्या ठिकाणी हुद्देदार बनलेल्यांनी तिकडच्या आपल्या आपल्या सुशिक्षित भाचे-पुतण्यांना बोलावून नोकऱ्या लावाव्यात आणि मुंबईला मायपोट मानणाऱ्या मराठी तरुणांची अवस्था ‘अप्लाय अप्लाय नो रिप्लाय अशी व्हावी.’
बेकार माणसांना बाहेरच्यांकडून उपहास आणि त्यामुळे घरच्यांकडून तिरस्कार सहन करावा लागतो. तो अगतिक असतो. हा अगतिकपणा वाईट. वाईट मार्गालाही नेऊ शकतो. मराठी तरुणांच्या या स्थितीकडे लक्ष देण्याची गरज कोणत्याही राजकीय पक्षाला वाटत नव्हती. त्यावेळी प्रादेशिक पक्ष ही संकल्पना दक्षिणेकडून अद्याप वर सरकली नव्हती. मराठी तरुण, त्याचा बाप यांची बाजू घेऊन भांडायला कोणी नव्हते. मराठी माणूस आणि त्याच्या स्वतःच्या राज्यात त्याचे हक्क यासाठी भांडण्याकरीता कोणाची तरी गरज होती.
मराठीतील एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून मी ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा वाचक होतोच. मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूमध्ये असताना बाळासाहेबांचे एक डेमॉन्स्ट्रेशन झाले होते. तेव्हापासून त्यांच्या रेषेच्या

संदर्भ प्रकार: