महाराष्ट्राचे महामंथन

- लालजी पेंडसे
माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी शेवटच्या प्रकरणात संयुक्त महाराष्ट्राचा लढा अगदीच थोडक्यात उरकला आहे. तब्येत साथ देत नसल्यामुळे त्यांनी हे केल्याचं सांगितलं. कदाचित संयुक्त महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या लाथाळ्यांमुळे त्यांचं मन खट्टू झालं होतं. तो कोळसा त्यांना उगाळायचाही नसेल. संयुक्त महाराष्ट्राचा विषय आवरता घेताना त्यांनी लालजी पेंडसेंचा महाराष्ट्राचे महामंथन हा ग्रंथ वाचण्याची शिफारस केली आहे. पण या ग्रंथात प्रबोधनकारांचा उल्लेख असून नसल्यासारखाच आहे. प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे एक महत्त्वाचे नेते होते. आंदोलनाच्या पंचप्राणांपैकी एक होते. पण त्यांच्या योगदानाचा ओझरताही उल्लेख यात सापडत नाही.
***
महाराष्ट्रद्रोहाच्या या सामुदायिक कटासंबंधी जनतेचा आवाज उठविला गेला पाहिजे. ‘डांगवरून हात उचला’ ही घोषणा शहराशहरांतून व माळरानातून घुमली पाहिजे. हे संकट निव्वळ राजकीय नाही. सारे मराठी जीवन ग्रासणारे हे संकट आहे. सर्व पक्ष, गट व जनता एकत्र येऊन या संकटाविरुद्ध भिडली पाहिजे ही अवस्था उत्पन्न झाली. पुन्हा पुढारी दर्शनाची वारी मी सुरू केली. एक पत्रक तयार केले व सर्व विचारांच्या व पक्षांच्या पुढाऱ्यांच्या त्यावर सह्या गोळा करण्यासाठी हिंडलो. अठरा सह्यांनिशी हे पत्रक प्रसिद्ध करून ३ जून हा ‘डांग निषेध दिन’ सर्वत्र पाळावा असा आदेश दिला. या पत्रकावर कै. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, जयंतराव टिळक, कै. दा. वि. गोखले, श्री. शं. नवरे, नाना पाटील, एस. एस. मिरजकर, कै. शं. वा. देशपांडे, केशवराव ठाकरे, सेनापती बापट, डॉ. गोपाळराव देशमुख, कै. सी. के. बोले आदी पुढाऱ्यांच्या सह्या आहेत. नाहीत, गोरे व त्यांची साथी मंडळी यांच्या! श्री. गोरे यांनी मला स्वच्छ सांगितले की आम्ही तुमच्यात येणार नाही व सही करीत नाही. आमचे आम्ही स्वतंत्र करू. बेळगावच्या लढ्यावर सर्व लक्ष केंद्रित करण्यासाठी समितीतून बाहेर पडणे व तेव्हापासून काही न करणे या आजच्या धोरणासारखेच तेव्हासुद्धा झाले. (साथींनी काही केले नाही.)
***
परिषदेत पुन्हा प्राणवायू संचारला
संयुक्त महाराष्ट्र परिषदेत पुन्हा प्राणवायू फुंकला गेला. जे. व्ही. पी. रिपोर्टानंतर चार दिशांना तोंडे फिरवून एकमेकांवर दुगाण्या झाडीत दूर झालेले संयुक्त महाराष्ट्राचे ‘निष्ठावंत’ शिलेदार आपापल्या ‘कंगणीदार भरजरी पगड्या’ सावरीत परिषदेच्या कार्यालयात येरझारा घालू लागले. अमक्यातमक्या बरोबर यापुढे काम करणे शक्य नाही म्हणून क़डक बंदिस्तपणाने दूर राहणारे आपल्या प्रतिज्ञा विसरून एकमेकांशी खेळीमेळीने बोल-वावरू लागले. मुंबईच्या वातावरणाचाही तो प्रभाव असेल. कारण परिषदेची कचेरी पुण्याच्या कर्मठ वातावरणातून या महान नगरीच्या सदा उत्फुल्ल वातावरणात आली होती. येथे मनाच्या अढ्या नाहीत. सख्य नि भांडण दोन्हीही कशी उत्कंठ अन् दिलखुलास, एकमेकांच्य हातात हात घालून वावरतात.
१९५४ साल उजाडले ते कागदी घोड्यांच्या भाऊगर्दीत. उच्चाधिकार समितीचे काम सुरू होऊ घातले होते. पूर्वीच्या कमिशनपेक्षा या कमिशनचा क्षेत्रविस्तार मोठा होता. सामान्यपणे नेमून दिलेल्या मुद्यांपलीकडे जाऊनसुद्धा योग्य वाटतील त्या सूचनांची व तदंगभूत प्रश्नांची चौकशी करून शिफारशी करण्याचा त्याला अधिकार होता. मध्यंतरीचा तात्पुरता निवाडाही ते देऊ शकणार होते. यामुळे त्याच्यापुढे सादर करावयाच्य कैफियती व पुरावे विस्तृत, व्यापक व भरभक्कम स्वरूपाचे असायला पाहिजे होते व ते काम-अधिक श्रमाचे, सावधानतेचे, जबाबदारीचे होते. एकापरीने भावी भारताची रचनाच त्यातून निर्माण व्हावयाची होती.
यामुळे कागदांची व पुराव्यांची जमवाजमव करणे आणि आपापली निवेदने तयार करणे हे काम साऱ्या भारतातच सुरू झाले. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने ह काम करण्यासाठी श्री. धनंजयराव गाडगीळ यांच्या आधिपत्याने एक निवेदन समिती नेमली. ही निवेदने दोन प्रकारची असावी असे ठरले होते. हे प्रकार असे की मराठवाडा व महाविदर्भ या तुलनेने अधिक अविकसित विभागांचे स्थानिक स्वरूपाचे प्रश्न व त्यांचा निरास यांना अनुलक्षून त्या त्या विभागातर्फे सादर करावी. आणि शिवाय या सर्वांना संकलित करणारे व समग्र संकल्पित संयुक्त महाराष्ट्राची मूलभूत समस्या मांडणारे एक मुख्य निवेदन परिषदेतर्फे सादर करावे असे ठरले आणि त्या

संदर्भ प्रकार: