डॉ. बाबासाहेब आंबेडकर

- धनंजय कीर
धनंजय कीरांचं आंबेडकर चरित्र अनेक अर्थांनी महत्त्वाचं मानलं जातं. एकतर बाबासाहेब जिवंत असताना हे आलं म्हणून आणि दुसरं म्हणजे बाबासाहेबांचं हे पहिलंच सविस्तर चरित्र. प्रबोधनकार हे बाबासाहेबांचे समकालीन. समतेच्या लढाईतले हे दोन महत्त्वाचे नेते. म्हणून या चरित्रातले प्रबोधनकारांविषयीचे हे संदर्भ.

महाडच्या मुक्तिसंग्रामाचे पडसाद महाराष्ट्रातच नव्हे, तर अखिल भारतात उमटले. महाडच्या या धर्मसंगरामुळे माणुसकी संपादण्याची मुहूर्तमेढच भारतात घातली गेली. स्पृश्यांनी अस्पृश्यांवर केलेल्या भेकड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी सभा झाल्या.
मुंबई येथील दामोदर सभागृहात रावबहादूर केशव सीताराम बोले यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली. आपल्या देशबंधूंवर जालियनवाला बागेतील अत्याचारासारखे अत्याचार करणाऱ्या क्रूरकर्म्यांचा सभेत कडकडून निषेध करण्यात आला. ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ पाक्षिकाचे संपादक देवराव नाईक आणि प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांची प्रक्षोभक भाषणे झाली. सभेच्या चालकांनी लोकांच्या आग्रहावरून देवराव नाईक नि प्रबोधनकार ठाकरे आदी पुढाऱ्यांना महाराच्या हातचे पाणी प्यायला देऊन त्यांचे सत्व पाहिले. ते तत्त्ववीर सत्त्वास जागले.
***
अस्पृश्य समाजाला नागरिक हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकर नेहमी जागरूक असत. ते तसला एकही समय व्यर्थ जाऊ देत नसत. संकटांस तोंड देऊनदेखील आपआपल्या हक्कांसाठी कसे झगडावे याचे शिक्षण देण्याची एकही संधी वाया जाऊ देत नसत. अशीच एक संधी त्यांना १९२८ च्या सप्टेंबर महिन्यातील गणेशोत्सवात लाभली. गणपतीची पूजाअर्चा अखिल हिंदुजनांस करता येते किंवा नाही हा होता वादाचा प्रश्न. सनातनी नि सुधारक पक्षांमधील मतभेद अगदी एकेरीवर आले. शेवटी आंबेडकरांचे प्रयत्न नि धमक्या ह्यांचा इष्ट तो परिणाम झाला. सी. के. बोले, प्रबोधनकार ठाकरे आदी समाजसुधारक मंडळी आणि आंबेडकरांचा समता संघ हे सर्व त्या बाबतीत धऐर्याने झगडले, सनातनी हटले. अखेर अस्पृश्य गणलेल्या हिंदुंनी मंडपामध्ये गणपतीच्या मूर्तीची पूजा करण्याचा अधिकार संपादन केला.
उत्सवचालकांच्या या कोलांटी उडीमुळे गणेशचतुर्थीच्या दिवशी वातावरण बरेच तंग झाले. उत्सवाच्या चालकांनी पराकाष्ठेची दक्षता घेतली. पोलिसांनाही बोलाविले. मंडपात जागोजाग गुंड उभे केले. जवळ जवळ एक सहस्र अस्पृश्य हिंदू मंडपाबाहेर एकत्र जमून आत प्रवेश करण्याची परवानगी मागू लागले. आंबेडकर, बोले, प्रबोधनकार केशवराव ठाकरे आणि दुसरे स्थानिक पुढारी त्या ठिकाणी जमले. त्या प्रचंड जनसमुदायास शांत राखण्याविषयी आंबेडकरांना फारच कष्ट पडले. सनातनी हिंदूंचे एक म्होरके डॉ. जावळे यांच्याशी बोलणी सुरू केली. आंबेडकरांनी अस्पृश्यांना केवळ मानवी हक्क मिळावे म्हणून विनंती केली. ही बोलणी निर्रथक ठरणार अशी चिन्हे दिसू लागली. परिस्थिती अधिकच स्फोटक झाली. लोकसमुदायाचा रेटा क्षणाक्षणास पुढेच सरकत आहे, हे ज्या वेळी सनातनी पुढाऱ्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले, तेव्हा त्यांनी शेवटी हात जोडले. दुपारी तीन वाजता त्यांनी आपल्या निर्णयात अनुकूल असा बदल केला. त्याबरोबर अस्पृश्य हिंदूंनी विजयोत्साहाने मंडपात प्रवेश केला.
***
आंबेडकर स्टार्ट समितीच्या कामात व्यग्र होते. शिवाय मंदिरप्रवेश चळवळीचे नेतृत्व स्पृश्य हिंदू नेत्यांकडे असल्यामुळे ते त्या सत्याग्रहापासून थोडे अलिप्त राहिले असले पाहिजेत. तरीही मुंबईच्या एका सभेत केलेल्या आपल्या खळबळजनक चालविलेल्या लढ्याला हार्दिक पाठिंबा देणे एवढेच मुंबईच्या दलित वर्गाचे कर्तव्य नाही. त्यांना आर्थिक साहाय्य दिले पाहिजे. आवश्यक तर सत्याग्रहास पुष्टी देण्याकरिता जथ्याजथ्यांनी पुण्यास जाण्यास सिद्ध राहिले पाहिजे. काही काळ थांबा आणि स्पृश्यांचे हृदयपरिवर्तन होईपर्यंत वाट पाहा, अशी विनंती करणाऱ्या लोकांच्या मनोवृत्तीचे वाभाडे काढण्यावाचून मला राहवत नाही. त्या काळात काँग्रेसने (राष्ट्रीय सभेने) ब्रिटिश लोकसभेला विवक्षित मर्यादेत म्हणजे ३१ डिसेंबर १९२९ पर्यंत साम्राज्यांतर्गत स्वराज्य देण्याविषयी निर्वाणीची अट घातली होती. तिचा उल्लेख करून डॉक्टर आंबेडकर स्पृश्य हिंदूंना टोमणा देण्याच्या उद्देशाने म्हणाले, ‘तर मग केवळ पूजास्थानी प्रवेश करण्याचे साधा माणुसकीचे अधिकार मिळविण्यासाठी दलित वर्गीयांना अधिक काल वाट पाहायला सांगण्यात त्यांचा लपंडाव असून बेगडी मुलामा आहे.’
आपल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले, ‘‘आपणही अशीच चळवळ मुंबईस सुरू करू आणि समतासंघाचा अध्यक्ष ह्या नात्याने चळवळ अंती यशस्वी होण्यासाठी मी प्रयत्न करीन.

संदर्भ प्रकार: