महाराष्ट्रातील प्रमुख संपादक: Page 2 of 3

ठोकून पि-या तेलाच्या गोंडस घाण्याला स्वत:स जुंपून घेण्यासारखे आहे...’
कोणाचाही मुलाहिजा न ठेवता रोखठोक भाषेत लिहिणे हे ठाकरे यांचे वैशिष्ट्य होते. पण ते केवळ भाषेपुरते मर्यादित नाही. त्यांचे विचार आजच्या काळालाही लागू पडतील असे आहेत. त्याच लेखात ते म्हणतात, ‘…मठ आला, की मठाधिपती आले ; की सांप्रदाय सुरू झाला ; सांप्रदायाच्या मागोमाग सांप्रदायिक गुलामगिरी ठेवलेलीच ’.
मुंबईत परप्रांतीय, विशेषत: दाक्षिणात्य मंडळी मोठ्या संख्येने येऊ लागली. त्यामुळे मराठी माणसाची गैरसोय होऊ लागली. त्याला ‘ प्रबोधन ’ने १९२२ मध्ये सर्वप्रथम तोंड फोडले. तसेच, पत्राच्या पहिल्या अंकापासून कवी वसंतविहार यांच्या समाजहितवादी कविता त्यात प्रसिद्ध होत असत. ‘ प्रबोधन ’चा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसार झाला. १९२३ मध्ये मुंबईत बसलेले बस्तान मोडून ‘ प्रबोधन ’ साता-यात स्थलांतरित झाले. तेथील काही कटु घटनांनंतर ठाकरे पुण्यात आले. तेथे ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादात तेही पडले.
काही ब्राह्मण मंडळींनी डिवचल्यामुळे पुण्यात छापखाना उभारुन ठाकरे यांनी ‘प्रबोधन ’ मासिक स्वरुपात आणि ‘ लोकहितवादी ’ हे साप्ताहिक सुरू केले. साहजिकच, पुण्यातल्या वादात ठाकरेही उतरले. महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात ठाकरे यांनी परखडपणे पुतळाविरोधकांचा समाचार घेतला. पण अखेर कंटाळून त्यांनी पुणे सोडले. मासिक व साप्ताहिकही १९२६ मध्ये बंद पडले. ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी स्वत:चे वर्तमानपत्र काढले नाही. पण अनेक वृत्तपत्रांत ते वेळोवेळी लिहीत राहिले.
अवघ्या पाच-सहा वर्षांच्या कालावधीत ठाकरे यांच्या ‘ प्रबोधन’ ने वृत्तपत्र व सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केली. या पत्राचे स्वरुप राजकीय पत्रांवर भर देणारे नव्हते. तर, आगरकरांप्रमाणे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारे होते. पण आगरकरांच्या सुधारणांचा पाया शास्त्रशुद्ध असला, तरी त्या पांढरपेशा मध्यमवर्गापुरत्याच होत्या. त्या बहुजन समाजापर्यंत पोचल्याच नाहीत. मात्र, ठाकरे यांनी ‘ प्रबोधन ’च्या माध्यमातून पुरस्कार केलेल्या सामाजिक सुधारणा अधिक व्यापक होत्या. फुले यांच्या विचारांनी व चळवळीने प्रचलित झालेल्या नव्या प्रवाहात ते सक्रिय सहभागी झाले होते. या चळवळीच्या कार्यासाठीच त्यांनी हे पत्र सुरू केले. त्यांना तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले.
ठाकरे यांचे लेखन कडवे व त्वेषपूर्ण असे. आक्रमक आणि विरोधकांना सळो की पळो करुन सोडील, असे बोचरे लेखन ते करीत. त्यांचे बोचकारे रक्तबंबाळ करणारे असत. ठाकरे हे वृत्तीने प्रचारक होते. त्यांचे पत्र पाक्षिक असल्याने त्यात ‘बातमी’ला फारसे स्थान नव्हते, ते मतपत्र होते. ठाकरे यांना मुळात वादविवादाची हौस असल्याने कोणी ‘ अरे ’ म्हटले, तर ‘ का रे ’ म्हणून ते थांबत नसत. दोन टोले जास्तीचे लगावून समोरच्याला निरुत्तर करत. पण वादविवादात केवळ हाणामारीनेच ते मात करत नसत. तर, प्रतिपक्षाची विधाने खोडून काढण्यासाठी तेवढेच जोरदार पुरावे ते सादर करत. आपले म्हणणे सप्रमाण मांडण्यासाठी ते कमालीची मेहनत घेत. पण एकदा वादाला सुरूवात झाली, की अगदी फटकळपणे ते मारा करीत. कोणाचाही मुलाहिजा ठेवीत नसत.
भल्याभल्यांना नामोहरम करताना त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. शाहू महाराजांवर त्यांची भक्ती ; पण क्षात्रजगतगुरू पीठ त्यांनी निर्माण करताच ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. आपले स्वत्व व स्वतंत्र बाणा त्यांनी कधीही सोडला नाही. कोणाचे मिंधेपण त्यांनी स्विकारले नाही. जरासा अपमान झाला, तर ताडकन संबंध सोडून ते बाजूला होत. ब्राह्मणेत्तर पक्षातील एक अध्वर्यू धनजी शाह कूपर यांचा धूर्तपणा लक्षात येताच सर्व गोष्टींचा काटेकोर हिशेब देऊन ठाकरे सर्व सोडून पुण्याला निघून आले. पुन्हा नव्याने सर्व उभे केले. त्यांचा हा बाणा अखेरपर्यंत कायम होता. आयुष्याच्या अखेरीला आचार्य अत्र्यांसारख्या माणसाला टक्कर देऊन त्यांना नामोहरम करण्याचा विक्रम ‘ प्रबोधन ’कारांनी केला.
ठाकरे यांच्या तडफदार व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ‘ प्रबोधन ’मधूनच झाले. तीच वृत्ती अखेरपर्यंत राहिल्याने ‘ प्रबोधनकार ’ हे त्यांना कायमसाठी लागलेले बिरुद सार्थ ठरले. बहुजन समाजासाठी झटणारे तडफदार, परखड

संदर्भ प्रकार: