महाराष्ट्रातील प्रमुख संपादक

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त डायमंड प्रकाशनाने प्रसिद्ध वक्ते प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथमाला प्रकाशित केली. त्यातलं एक पुस्तक, ‘महाराष्ट्रातील प्रमुख संपादक’. ऋता बावडेकर यांनी हे लिहिलंय. यामध्ये प्रबोधनकारांचा उल्लेख असणं स्वाभाविकच होतं. यातला हा लेख प्रबोधनकारांविषयी काही नवी माहिती देत नसला तरी ज्यांना प्रबोधनकार माहीतच नाहीत, त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. या लेखावर रा. के. लेले लिखित मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या पुस्तकातील माहितीची अत्यंत दाट छाया आहे.

वास्तविक केशव सीताराम ठाकरे हे केवळ पत्रकार कधीच नव्हते. छायाचित्रकार, तैलचित्रकार, शिक्षक, नाटककार, पटकथा-संवाद लेखक, ग्रंथलेखक, इतिहासकार, प्रचारक अशा अनेक भूमिकांत ते वावरले. काही एका उद्देशाने त्यांनी वर्तमानपत्र काढले. ते अल्पकाळ चालले पण ‘प्रबोधनकार ठाकरे ’ ही त्यांची ओळख आजतागायत कायम आहे. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांचे वडील, उद्धव-राज ठाकरे यांचे आजोबा या त्यांच्या ‘ उप-ओळखी ’ म्हणता येतील.
‘ तत्त्वविवेचक ’ छापखान्यात १९०८ च्या सुमारास ‘ असिस्टंट शास्त्री ’ अर्थात मुद्रितशोधक या नात्याने ठाकरे यांचा वृत्तपत्राशी प्रथम संबंध आला. तेथे लक्ष्मण नारायण जोशी ‘ हेडशास्त्री ’ होते. त्या काळात रोज निघणा-या आणि सरकारी दडपशाहीने लगेच गायब होणा-या हंगामी वृत्तपत्रांचे ते छुप्या रीतीने लेखन करत. अशा छुप्या लेखकाची दीक्षा त्यांनीच ठाकरे यांना दिली. त्याआधी विद्यार्थी असताना ठाकरे यांनी ‘ विद्यार्थी ’ हे मासिक चालविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोन-तीन साप्ताहिके व ‘ इंदुप्रकाश ’ पत्रात ते लेखन करत असत. ठाण्याच्या ‘ जगत्समाचार ’साठीही ते लेख लिहीत असत. जलशांच्या निमित्ताने ठाकरे जळगावला गेले. तेथे ‘काव्यरत्नावली’कार नारायण नरसिंह फडणीस यांच्याशी त्यांचा परिचय झाला. ठाकरे यांनी तेथे ‘ सारथी ’ हे मासिक सुरू केले. पत्रव्यवसायातील आपल्या या आगमनाचे श्रेय ठाकरे फडणिसांनाच देतात.
‘ प्रबोधन ’ प्राक्षिक काढण्यापूर्वी ठाकरे यांच्या सार्वजनिक कार्याची चर्चा सर्वत्र झाली होती. सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा ठाकरे यांचा निर्णय अभ्यासपूर्ण हेता. इतिहाससंशोधक वि. का. राजवाडे यांनी कायस्थ प्रभूंबाबत काही विधाने केली होती. त्यावर ‘ कोदण्डाचा टणत्कार ’ (१९१८) हा ग्रंथ लिहून त्यांनी राजवाडे यांची विधाने ऐतिहासिक पुरावे देऊन खोडून काढली होती. या प्रकरणी जागृतीसाठी महाराष्ट्रभर ठाकरे यांनी दौराही केला होता. ब्राह्मणेतर चळवळीकडेही ते त्यानंतर वळले. चळवळी, प्रचार करायचा, इतरांच्या प्रचाराला उत्तर द्यायचे, तर हाती वृत्तपत्रासारखे साधन हवे. या जाणिवेतून वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. त्यावेळी ते सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करत होते. सरकारी नोकरांना वृत्तपत्र चालविण्यास बंदी होती. पण ठाकरे यांनी तशी परवानगी मिळविली.
त्यानंतर १६ ऑक्टोबर १९२१ रोजी केशव सिताराम ठाकरे यांच्या ‘ प्रबोधन ’ पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पत्र पाक्षिक होते. पत्राच्या नावाबरोबर ‘ उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ’ असे संस्कृत वचन होते. त्याबरोबरच सामाजिक, धार्मिक व नैतिक गोष्टींना हे पत्र वाहिले असल्याचा उल्लेखही इंग्रजीत होतो.
अधिक मूलभूत सुधारणा म्हणून सामाजिक सुधारणांना ‘ प्रबोधन ’ने प्राधान्य दिले. अर्थात राजकारण या पत्राला वर्ज्य नव्हते. गोपाळ गणेश आगरकरांच्या ‘ सुधारक ’ नंतर सामाजिक सुधारणांना वाहिलेले हेच पत्र होते. प्रि. गो. चि. भाटे, गोपाळराव देवधर, गो. म. चिपळूणकर, भाऊराव पाटील आदींनी या पत्राला पाठिंबा दिला. त्यापैकी अनेकांचे लेखही पत्रात प्रसिद्द होत.
क्षात्रजगदगुरुंचे पीठ शाहू महाराजांनी निर्माण केले, त्यावेळी ठाकरे यांनी ‘ मानसिक दास्याविरुद्द बंड ’ (१९२२) असा टीकात्मक लेख लिहिला. पुढे जी ‘ ठाकरी भाषा ’, ‘ ठाकरी शैली ’ प्रचलित झाली, त्याचा प्रत्यय या लेखात येतो- ‘..वर्णाश्रमवादी ब्राह्मण जगतगुरूच्या मानसिक दास्यप्रवर्तक भिक्षुकशाहीला जमीनदोस्त करण्यासाठी थेट तसल्याच तत्त्वांवर उभारलेल्या क्षात्र-जगदगुरुच्या मठाला निर्माण करणे म्हणजे जोखडासाठीच देवाने आपल्याला मान दिलेली आहे, ही कल्पना दृढमूल झालेल्या बैलाने ना-या तेलाच्या घाण्याला रामराम

संदर्भ प्रकार: