मराठी वृत्तपत्रांचा इतिहास

- रा. के. लेले

प्रबोधनकारांच्या कर्तृत्वाचं एक प्रमुख अंग हे पत्रकारितेचं. त्यांच्या या कर्तृत्वाविषयी खूप चांगली माहिती रा. के. लेले लिखित मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या महाग्रंथात वाचायला मिळते.
.............
प्रबोधन : केशव सीताराम ठाकरे (1885-1973)
अल्पकाळ चाललेल्या पत्राचे कर्ते हे बिरुद कायमचे चिकटून हयातभर त्याच नावाने ज्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला राहिली, ते संपादक केशव सीताराम ठाकरे हे होत, व त्यांना कायमची उपाधी ज्यामुळे चिकटली ते त्यांचे पत्र म्हणजे 'प्रबोधन' हे होय. 'प्रबोधनकार' म्हणून ठाकरे ख्यातनाम असले, तरी केवळ पत्रकार एवढीच त्यांची प्रतिमा नाही. ज्या पत्राचे नाव त्यांना कायमचे चिकटले ते 'प्रबोधन' पत्र फार दिवस चालले असेही नाही. 'प्रबोधन' बंद झाल्यावर अनेक पत्रांतून त्यांचे लेखन चालू असे. तरी पत्रकारिता हा ठाकरे यांच्या बहुरंगी, बहुढंगी व बहुरूपी जीवनाचा केवळ भाग होता. जिनगर, छायाचित्रकार, तैलचित्रकार, शिक्षक, नाटककार, टंकलेखक, पटकथा-संवाद-लेखक, ग्रंथलेखक, इतिहासकार, प्रचारक, पत्रकार, इत्यादी अनेक भूमिकांत ठाकरे वावरले. समाजसुधारणा, चळवळ व वक्तृत्व हीही त्यांच्या जीवनाची महत्त्वाची अंगे होती. ब्राह्मणेतर चळवळीतही ठाकरे यांनी सक्रीय भाग घेतला होता. आपल्या जीवनाचे ध्येय, ठाकरे सांगत ते असे की, ''जन्मप्राप्त नि कर्मप्राप्त व्यवहाराच्या रंगभूमीवर पडेल ती भूमिका उत्तम वठविण्याची धडपड करणारा (मी) एक धडपडया नाटक्या'' आहे. तसेच, ''आपला पिंड राजकारणी नसून समाजकारणी''आहे, असेही त्यांनी म्हणून ठेवले आहे. प्रबोधनकारांना शिक्षण फारसे घेता आले नाही. पण त्यांची ज्ञानलालसा जबर होती. स्वाध्यायाच्या बळावर जे ज्ञान त्यांनी संपादन केले ते विद्यापीठाच्या मोठमोठया पदव्यांसह वावरणा-या पंडितांपेक्षाही किती तरी वरचढ होते. गेल्या शतकाच्या शेटवच्या चरणात जन्मलेल्या (1885) प्रबोधनकारांनी आपल्या लेखणीने, वक्तृत्वाने व कर्तृत्वाने आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात स्वत:साठी एक वैशिष्टयपूर्ण स्थान निर्माण केले आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांचा वृत्तपत्राशी प्रथम संबंध आला, तो 'तत्त्वविवेचक' छापखान्यात 'असिस्टंट शास्त्री' म्हणजे 'असिस्टंट प्रूफरीडर, (मुद्रितशोधक) म्हणून काम करू लागल्यावर. 1908 चा तो सुमार असावा. तेथे 'गुराखी' पत्राचे सहसंपादक म्हणून शिक्षा भोगलेले लक्ष्मण नारायण जोशी हे 'हेडशास्त्री' होते. हे जोशी त्या काळात रोज निघणा-या आणि सरकारी दडपशाहीने त्वरित अस्तंगत होणा-या हंगामी वृत्तपत्रांचे संपादकीय लेखन करणारे छुपे लेखक होते. जोशी यांचे लेखन संपादकांच्या नावे खपे व सरकारी रोषाची पाळी आली तरी ते नामानिराळे राहात. त्याच लखुनाना जोशांनी अशा छुप्या वृत्तपत्रीय लेखनाची दीक्षा ठाकरे यांना देऊन त्यांचेही त्या क्षेत्रात बस्तान बसवून दिले. त्याआधी विद्यार्थी दशेत ठाकरे यांनी एकहाती 'विद्यार्थी' नावाचे मासिक चालविण्याचा खटाटोप केला होता. त्यानंतर दोनतीन साप्ताहिके व दामोदरशेट यंदे यांच्या 'इंदुप्रकाश' पत्रात ठाकरे लेखन करीत असत. तसेच ठाण्याच्या 'जगत्समाचार' पत्रासाठी काही काळ संपादकीय लेखही ते लिहीत असत.
ग्रामोफोनच्या जलशांचे प्रयोग करण्याच्या निमित्ताने ठाकरे जळगावला गेले असता 'काव्यरत्नावली' कार नारायण नरसिंह फडणीस यांच्याशी त्यांचा स्नेह जुळून आला. फडणिसांच्या सक्रिय उत्तेजनाने ठाकरे यांनी 'सारथी' नावाचे मासिक सुरू केले. ते मासिक वर्षभर चालले. 'माझ्या पत्रव्यवसायाचा हा श्रीगणेशा नानांनीच (फडणिसांनी) हात धरून काढविला होता,' असे ठाकरे म्हणत असत. ठाकरे यांचे 'प्रबोधन' पाक्षिक पुढे 1921 साली जन्माला आले. पण तत्पूर्वी त्यांच्या सार्वजनिक कार्याचा बोलबाला झालेला होता. सामाजिक अन्यायांविरुध्द उभे राहण्याचा ठाकरे यांनी अभ्यासाने निर्णय केला. ठाकरे यांनी पहिला हल्ला चढविला तो इतिहाससंशोधक राजवाडे यांनी कायस्थ प्रभूंबाबत केलेल्या काही विधानांवर. यासाठी 'कोदण्डाचा टणत्कार' हा ग्रंथ त्यांनी प्रसिध्द करून (1918) ऐतिहासिक पुराव्यानिशी राजवाडयांची विधाने खोडून काढली. राजवाडे प्रकरणी जागृती करण्यासाठी ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा काढला. त्यानिमित्ताने ठाकरे यांचा अनेक ब्राह्मणेतर बांधवांशी ऋणानुबंध जुळून आला. ठाकरे ब्राह्मणेतर चळवळीकडे आकर्षित झाले व कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे लक्षही त्यांनी वेधून घेतले. ठाकरे यांच्या या चळवळीतूनच त्यांचे वृत्तपत्र जन्मास आले. चळवळी, प्रचार करावयाचा, इतरांच्या प्रचाराला उत्तर द्यावयाचे म्हणजे वृत्तपत्रासारखे साधन हाती असले पाहिजे, या जाणिवेतूनच ठाकरे यांनी वृत्तपत्र सुरू करावयाचे ठरविले. त्या वेळी ते मुंबई सरकारच्या पी.डब्ल्यू. खात्यात हेडक्लार्क, रेकॉर्ड सेक्शन म्हणून काम करीत होते. सरकारी नोकरांना वृत्तपत्र चालविण्यास अर्थातच बंदी होती. 1921 च्या सप्टेंबरात वृत्तपत्र सुरू करण्याचा निश्चय मात्र ठाकरे करून बसले होते. वृत्तपत्र त्याप्रमाणे काढावयाचे तर एक खास परवानगी तरी मिळविली पाहिजे किंवा नोकरीचा राजीनामा तरी देणे

संदर्भ प्रकार: