धडाडीबाज प्रबोधनकार

- वासुदेव सीताराम बेंद्रे

प्रबोधनकारांच्या पंच्च्याहत्तरीनिमित्त अनेक नामवंतांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. प्रबोधकारांचा धडाडीबाज जीवनप्रवास थोडक्यात उलगडवून दाखवणारा हा लेख आहे, पुण्यातील लेखक वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा. तो सीकेपी 'विशेषांका'त छापला गेला होता.

 

जन्मतःच दरिद्र्याच्या पकडींत सांपडल्यास बालपणीहि मनावर होणारे आघात मनुष्याच्या बुद्धीला आणि प्रकृतीला विशिष्ट प्रकारचें वळण लावण्यास कारणीभूत होतात. कार्यावरील कट्टर निष्ठा, बुद्धीला तीव्रतर संवेदना देण्याची सवय, जबाबदारीबाबत पापभिरू जागृति, लेखन-हुन्नर-कलासुरकींत, निर्भयता, उपेक्षिलेल्यांच्या उत्क्रांतिसाठीं उत्सूर्त भावना आदि गुणांना जशी गरिबी व बालपणांतील आबाळ बालमनांत दृढतेनें ठाव देऊं लागते, तशीच या दरिद्र्यामुळें बुद्धीची वाढ व साफल्यता यांत हरघटकीं भोगावी लागणारी निराशा आणि समाजाकडून मिळणा-या विषम वागणुकीमुळें बुद्धिविकासाला पडणारी मुरड हींच त्या माणसांच्या वृत्तींना वयाबरोबर तिखट मनोर्मीची जोड करून देतात. अशा मनस्थितींत जर चित्ताला स्थिरता देणारी पण चिरकाल टिकणारी, घटना कालवशात घडून न आली तर थोर बुद्धिवादी, हुन्नरबाज, कर्तृत्वशाली किंवा लोकहितवादी माणसांचे जीवनहि स्वार्थापरार्थाबद्दल तितकेंच बेदरकारी बनतें. नैराश्यात उद्भवणारी कठोर बेदरकारी प्रवृत्ति त्यांच्या माणुसकीच्या जिव्हाळ्याला रुक्षता आणते आणि सुदैवाने परिस्थिती बदलून निरावादांतून मोकळीक होईपर्यंत अशा दुर्दैवी माणसांना समाजापासून अलिप्त राहाण्याची पाळी येते. परंतु या दैवापत्तींतून मुक्तता होतांच तीच जनता त्याच माणुसकीच्या जिव्हाळ्याची खरी पारख करते व आपुलकीच्या शुद्ध भावनेनें त्या व्यक्तीशी समरस पावते. प्रबोधनकार ठाकरेंच्या आयुष्यांतील घडामोडींचे छायाचित्र अशाच स्वरुपांत मिळत असलें तर नवल कसले?

श्री. ठाकरे यांचे वडिल साधे तालुका कोर्टाचे बेलिफ होते. या गरिबीतहि श्री. ठाकरेंना आपलें बालपण आबाळींत, परंतु कौंटुबिक सुखासमाधानानें काढतां आलें. शेजारीपाजारी आप्तेष्ट मंडळीकडून धार्मिक व सामाजिक उत्सवमहोत्सवांत कराव्या लागणा-या कलाकुसरीच्या कामांत त्यांना शाबासकी मिळविली. शाळेंतील हुशार व कलावंत विद्यार्थी म्हणून मान्यता मिळविली, इतकेंच नव्हे तर आपल्या चौकसपूर्ण प्रारंभीच्या वाचन-लेखन-विवेचन-चिकित्सेनें पनवेल येथील शाळाधिका-यांबरोबर तेथील केरळ कोकिळाचे नामवंत संपादक कै. आठल्ये यांचीहि मर्जी संपादून घेतली होती. कदाचिक या ''केरळ कोकिळ'' संस्थेशी आलेला संबंधच श्री. ठाकरे यांची लेखनव्यवसायाकडे विशिष्ठ प्रवृत्ति होण्यास बिजरूपानें कारण झाली म्हटलें तर चूक होणार नाही. त्यामुळे त्यांची बुद्धिवादी कार्यातील कर्तृत्वाची जाणीव अधिक दृढ होऊं लागली, आणि श्री. ठाकरेंना बुद्धिविकासाला चांगलाच वाव मिळणार अशी सुखस्वप्नें पडूं लागली. परंतु त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनें त्यांना पनवेल सोडून एका कुटुंबाच्या आश्रयानें जाऊन राहावें लागलें. नवीन वातावरण जरि परिचित व आवडीचें होतें तरी पनवेलला बसलेली बैठक विस्कटली गेली. त्यांत परावलंबनाची जाणीव परिस्थितीमुळें तीव्रतेनें भासण्याइतका त्यांचा मनाला समजुतदारपणा आला होता. अर्थातच त्यांच्या शिक्षणाकांक्षेला व बुद्धिविकासाच्या मार्गांना मुरड घालण्याची पाळी आली. लेखनकलेच्या पहिल्या दालनांत प्रवेश होतांच पुढचा पडदा पडला. एक दोन वर्षांतच देवासचा आश्रय करावा लागला. तेथें कसेंबसें माध्यमिक शिक्षणाच्या तडीला लागतात तोंच, पैशाच्या अभावीं तयारी होऊनहि, तत्कालीन सरकारी नोकरीच्या एकमेव धंदा-रोजगारीच्या पात्रतेच्या शिक्यामोतंबाला मुकावें लागले. जीवनाच्या पुढच्या अवकाशांत श्री. ठाकरेंना दारिद्र्याच्या परिस्थितीशी झगडा देतांना ही दुर्बळता बरीच जाणवली.

आयुष्याच्या नव्या टप्यांत पदार्पण करितांना श्री. ठाकरेंना तत्कालीन परिस्थिती व जीवनाची चाकोरी तितकीशी उपकारक नव्हती. कारण यतिविहीत धंदारोजगारी ठरीव साच्याची व ठरीव मामल्याची होऊन राहिली होती. लेखनव्यवसाय हें कांही आर्थिक प्राप्तीचें साधन नव्हतें. श्री. ठाकरेंना तत्कालीन जाती-जातींच्या चढाओढींत एकच आणि तेंहि मर्यादित असें क्षेत्र मोकळें होतें आणि तें म्हणजे सरकारी नोकरीचें. परंतु त्यास आवश्यक अशी शालांत परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधीच त्यांना मिळूं शकली नव्हती. अशा परिस्थितींत कामधंद्याचे क्षेत्र मुंबई हेंच सर्वांना माय पोट होते. श्री. ठाकरे मुंबईस आले, परंतु मुंबईसारख्या बकाली वस्तींत त्यांना स्वजातीय निराधार उमेदवारांच्या एका गटाच्या आश्रयास जावें लागलें आणि श्री. ठाकरेंच्या जीवनाला जी स्थिरता लाभणें जरूर होतें. त्याऐवजी त्यांना अस्थिर वृत्तीच्या मित्रगणांत रमावें लागलें. याहि स्वैराचारियांत त्यांनी आपल्या बुद्धीची तडफ

संदर्भ प्रकार: