सीकेपी विशेषांक...

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचा अल्प परिचय

लेखकः रं. ग. कुळकर्णी, अंधेरी

प्रबोधनकार केशव सिताराम उर्फ दादासाहेब ठाकरे यांच्या वयाला येत्या सप्टेंबर महिन्यांत ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ''याच देहीं याच डोळां'' संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालेलें पाहण्याचें भाग्य त्यांना लाभले आहे. त्याचप्रमाणें त्यांचे प्रबोधन कार्य नव्या जमान्यांत नव्या पद्धतीनें चालविण्याकरितां त्यांचे चिरंजीव बद्धपरिकर झालेले पाहून त्यांना विशेष आनंद होणें साहजीक आहे. प्रबोधनकार आपलें सबंध जीवन ''निस्पृहस्य तृणं जगत्'' या वृत्तीनें जगले. त्यांचे जगत् म्हणजे बहुजन समाज. त्या समाजाला त्यांनी अंगाखांद्यावर खेळवून, नवमत वादाचें दूध पाजून धष्टपुष्ट बनविले. मग त्यांनी तृणवत कोणाला मानलें? हिंदुसमाजाची प्रगति रोखणा-या जीर्ण मतवाद्यांना! मुखलेपानें त्यांची प्रभावी वाणी बंद करूं पाहणा-या किंवा त्यांच्या लेखणीची तिखट तलवार विकत घेऊं पाहणा-या धृष्ट धनिकांना आणि मदांध सत्ताधा-यांना!
दादासाहेब ठाकरे यांच्या स्वावलंबी आणि स्वतंत्र जीवनाचे सर्व पैलू एका लहानशा लेखांत प्रकट करणें सामान्य लेखकाला शक्य नाहीं. एखादा सिद्धहस्त लेखकच कदाचित तें काम करूं शकेल. खरें पाहिलें तर त्यांचा मूळ पिंड सत्यशोधकाचा आणि नवमतवादी प्रजारकाचा! नाटककार, इतिहासकार, वृत्तपत्रकार, वक्ता, कवि इत्यादि त्यांच्या विविध भूमिकांमधून त्यांनी आपलीं नियतकार्य अत्यंत प्रभावीरीतीनें पार पडलेलें दिसत आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यांतील त्यांची कामगिरी तर अविस्मरणीय अशी झाली.
कुलाबा जिल्ह्याच्या परिसरांत शिवरायांच्या दीर्घ साहचर्यानं पुनीत झालेल्या शेंकडों कायस्थ प्रभू कुटुंबांपैकी एका कुटुंबांत दादासाहेब ठाकरे यांचा जन्म पनवेल मुक्कामी दिनांक १७-९-१८८५ रोजीं झाला. त्यांच्या बालपणीं त्यांच्या कुटुंबाची सांपत्तिक स्थिति साधारणच होती. त्यांचे शिक्षण पुरें होण्यापूर्वीच त्यांचे वडील वारले आणि कुटुंबाचा भार वडील भाऊ या नात्यानें त्यांच्यावर पडला. स्वभाव पराकोटीचा मानी, म्हणून वडिलांनी घेतलेलें पनवेलच्या टांग्यावर नंबर रंगविण्याचें कॉन्ट्रॅक्ट, स्वतःच्या हातांत रंगाचे कुंचले घेऊन त्यांनी पुरें करून दिलें. या निमित्तानें हातांत आलेला कुंचला त्यांच्या आयुष्यांत पुढें पुष्कळ वेळां उपयोगी पडला. ‘व्हाइट अवेलडेलॉ’ सारख्या नामांकित युरोपियन दुकानाचा नाम फलक उंच परांचीवर चढून त्याच कुंचल्यानी त्यांनीं रंगविला आणि त्या नंतर सुखवस्तु गृहस्थ-गृहिणींची तैल चित्रें रंगविण्याकरितांहि त्याचा उपयोग केला. तो कुचला आतां त्यांच्या चिरंजीवांच्या समर्थ हातांत व्यंगचित्र-निर्मितीचें काम उत्साहानें पार पाडीत आहे. असो.
वडील वारले त्या सुमाराला एक नाटक मंडळी पनवेलला आली होती. १६व्या वर्षी लिहून पुरें केलेलें एक नाटक घेऊन, दादासाहेब नाटक मंडळीच्या बि-हाडीं गेले. मालकांपुढें नाटकाचें वाचन झालें. मालकांस तें पसंत पडलें. पुढे ४/६ वर्षे निरनिराळ्या नाटक मंडळ्यांस नाटक पसंतीच्या कामी मार्गदर्शन करीत दादासाहेबांचा संचार नाटक मंडळ्यांबरोबर महाराष्ट्रांत पुष्कळ ठिकाणी झाला. त्यावेळच्या त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळें त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा पोटाचा धंदा करावा लागत होता. जो उद्योग ते पत्करीत, तो मग विक्रेत्याचा असो, टंक लेखकाचा असो कीं छायाचित्रकाराचा असो त्यांत स्वतःची बुद्धि वापरून ते करीत. आणि हे पोटाचे उद्योग चालू असतांनाच वाचनाचा आणि लेखनाचा सपाटा सुरु असे. स्वतःच्या खर्चानें हजोरों रुपयांची पुस्तकें खरेदी करून तो संग्रह वयाची चाळिशी उलटण्याच्या आंत एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेला त्यांनी अर्पण केला. आजचा त्यांचा ग्रंथसंग्रह पाहिला तरी सामान्य संसारी परंतु विद्याभिलाषी माणून सा करूं शकतो या विचारानें मन थक्क होतें.
लेखनाला सुरवांत त्यांनी अगदीं बालवयांतच केलेली दिसतें. कारण १८९८ सालीं म्हणजे त्यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी कै. हरि नारायण आपटे यांच्या प्रसिद्ध ''करमणूक'' पत्रांत त्यांचा ''मानपत्राची आणि छत्र्यांची उत्पत्ति'' या शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झालेला आढळतो. त्यानंतर ‘इंदुप्रकाश'’, ‘सयाजी विजय’, '' ‘कामगार समाचार’, ‘मुंबई वैभव’, ‘रंगभूमि’ इ. नियतकालिकांतून त्यांचे लेख सतत येत होते. १९०७-८चे सुमारास ते दादरला स्थायिक झाले आणि तेव्हांपासून त्यांच्या इतिहास व्यासंगाला जोर चढला. १९१४-१५ सालापर्यंत ते व्यवस्थित नोकरी-धंदा सांभाळून वाचन लेखनाचें कार्य करीत होते. पुढें त्यांना सामाजिक चळवळींना उठाव देण्यास

संदर्भ प्रकार: