बाबासाहेब आणि प्रबोधनकार

प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटचे संकल्पक सचिन परब हे पत्रकार आहेत. प्रिंट, टीव्ही, इंटरनेट अशा विविध प्रकारच्या मीडियात ते वावरतायत. हे सगळं सुरू असताना ते एक गोष्ट विसरत नाहीत. ते म्हणजे सामाजिक भान असलेलं लिखाण करणं. ‘माझं आभाळ’ नावाच्या त्यांच्या ब्लॉगवर ते लिहित असतात. प्रबोधनकार हा त्यांचा आवडता विषय. प्रबोधनकारांवर लिहिण्यासाठी तर ते निमित्तच शोधत असतात. या लेखाचं निमित्त आहे, सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाणदिन...
परवा सहा डिसेंबर आहे. महापरिनिर्वाणदिन. आतापासूनच चैत्यभूमीवर भीमसैनिकांचे थवे हळूहळू जमा होऊ लागलेत. येत्या दोन तीन दिवसांत महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून निळा सागर एकत्र होईल. दरवर्षी इथली गर्दी वाढतेच आहे. पण ही फक्त गर्दी नाही. एक निश्चित विचारधारा असणारी आणि इतिहासाचा प्रवाह बदलण्याची जिगर असणारी एक मोठी ताकद आहे. जरा लक्षपूर्वक पाहिलं की त्यात राखेची पुटं चढलेला ज्वालामुखी दिसतो. दरवर्षी शिवाजी पार्कवर या आगीची धग अनुभवायला मिळते.

हो शिवाजी पार्कवरच. चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींचं दर्शन घेण्यासाठी तासन्तास रांगा लावल्यानंतर खरा सोहळा असतो तो पार्कातच. लाखो रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते. एक अखिल भारतीय साहित्य संमेलन सोडल्यास इतकी उलाढाल अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच होत नाही. ही फक्त खरेदीविक्री नसते तर विचारांची देवाणघेवाण होते. वरच्या पट्टीतल्या जलशांनी पार्कातलं रात्रीचं काळं आकाश गडद निळं होऊन जातं. नेत्यांची भाषणंही होतात. भन्तेजींच्या चर्चा घडतात. कार्यकर्त्यांच्या घामाने शिवाजी पार्काची जमीन पवित्र होते.

शिवाजी पार्काविषयी अशीच नितांत श्रद्धेची भावना आहे ती शिवसैनिकाची. ते त्याच्यासाठी पार्क नाही, शिवतीर्थ आहे. शिवसेनाप्रमुख हे त्याचा देव आहेत. आणि त्यांची कर्मभूमी म्हणून शिवाजी पार्क त्याला तीर्थक्षेत्र वाटू लागलेय. गेली जवळपास पन्नास वर्षं बाळासाहेब शिवाजी पार्क दणाणून सोडत आहेत. मुंबईच्या इतिहासात इतका दीर्घकाळ नेतृत्वाचं गारूड करणारा राजकीय पुढारी दुसरा नाही. दर दस-याला भीमसैनिक नागपुरातल्या दीक्षाभूमीत गोळा होतात तर शिवसैनिक इथे. तो त्याच्यासाठी सगळ्यात मोठा सणसोहळा असतो. मोठमोठ्या लोकांना बाळासाहेबांच्या भाषणात काहीही मिळत नाही. पण शिवसैनिकासाठी ते विचारांचं सोनं असतो. तो त्याने भारून जातो. त्याच्याच जोरावर वर्षभर जगाला शिंगावर घेत राहतो.

एकच शिवाजी पार्क. पण दोन्ही ध्रुव इथे एकत्र येतात. एक सोहळा निळा. दुसरा भगवा. दोघे दोन टोकाच्या विचारधारांचे. साम्य तसं थेट काहीच नाही. पण एक आहे, कार्यकर्त्यांची मूस मात्र दोन्हीकडे सारखीच. दोन्हीकडचे कार्यकर्ते पुढचा मागचा फारसा विचार न करता रस्त्यावर उतरणारे, ठसन देणारे, समोरच्याला खडे खडे नडणारे, साधारणतः एकाच आर्थिक गटातले आणि कमालीची निष्ठा ठेवणारे. निळा आणि भगवा दोघांमधे जमीनअस्मानाचं अंतर. पण शिवाजी पार्क त्यांच्यासाठी क्षितिज बनतं. दोघांचीही ती निष्ठाभूमी.

याच क्षितिजाच्या साक्षीनं दोघांनी एकत्र यावं म्हणून अनेकदा प्रयत्न झाले. शिवशक्ती भीमशक्ती ही काही उद्धव ठाकरेंची घोषणा नाही. बाळासाहेबांच्या मार्मिकमधल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन पाहिलंय का? नसेल तर नव्या शिवसेनाभवनातल्या भिंतींवर मार्मिकची बाळासाहेबांनी बनवलेली कवर लावलेली आहेत. शिवशक्ती भीमशक्तीची घोषणा साठच्या दशकातच मार्मिकच्या कवरवर आली होती, हे कुणालाही पाहता येईल. सेनेच्या सुरुवातीच्या काळात तेव्हाचा नवशिक्षित नवबौद्ध तरुण बाळासाहेबांकडे आकर्षित झाला होताच. पण पुढे या धाग्यांमधली वीण सुटतच राहिली. वरळीच्या बीडीटी चाळीतल्या राड्यापासून मराठवाड्यातल्या नामांतर दंगलीपर्यंत. रिडल्समधेही तेच घडलं. तरीही युतीच्या काळात नामदेव ढसाळ त्यांच्या समष्टीसाठी सेनेकडे आले होते. पण या संघर्षाचं ओझं खांद्यावर नसलेल्या उद्धव ठाकरेंनी शिवशक्ती भीमशक्तीला पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न केला. आज तो अपयशी ठरला असचं म्हणावं लागेल.

या सगळ्या पार्श्वभूमीवर एक ऋणानुबंध खूप महत्त्वाचा आहे. इतिहासातलं असलं तरी ते आजही तितकंच अर्थपूर्ण असं नातं आहे. हे नातं आहे दोन दिग्गजांच्या, समतेच्या लढाईतल्या दोन सेनापतींमधलं प्रेमाचं नातं. एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दोन प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. प्रबोधनकार आणि घटनाकार, दोघेही समकालीन.

संदर्भ प्रकार: