नाटककार प्रबोधनकार

- प्रभाकर पणशीकर

प्रबोधनकारांच्या नाटकांवर हा सविस्तर लेख लिहिलाय, ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी. साहित्य संस्कृती मंडळाने प्रबोधनकारांच्या पाच नाटकांचा एकत्र खंड प्रकाशित केला तेव्हा याची प्रस्तावना म्हणून हा लेख लिहिण्यात आला होता.

विसाव्या शतकात महाराष्ट्रात जी काही वैशिष्ट पूर्ण व्यक्तीमत्वं निर्माण झाली त्यापैकी एक धगधगतं आणि सळसळतं व्यक्तिमत्व म्हणजे कै. केशवराव सिताराम ठाकरे. अर्वाचीन महाराष्ट्राच्या सामाजिक जाणिवा ज्यांनी समृद्ध केल्या, त्या जाणिवा ज्यांनी सातत्याने आणि प्रामाणिक प्रयत्न करून विस्तारल्या त्यापैकी एक अग्रणी म्हणजे कै. के. सी. ठाकरे. आपल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर, अंधश्रद्धेवर, भिक्षुकशाहीवर आणि अस्पृश्यांच्या जटिल प्रश्नांवर सातत्याने कठोर भाषेत टीका करून त्यांनी आपल्या या सुस्त समाजाला खडबडून जागं करण्याचा उपक्रम केला. ज्या काळात वृत्तपत्रांचे संपादकच मालक असत आणि आपलं नाव ते मोठ्या अभिमानानं पहिल्या पानावर ठळक अक्षरांत छापीत असत. आपल्या मतांचा निर्भिड ठसा त्या वृत्तपत्रावर उमटवीत असत त्या काळातलं ‘प्रबोधन’ हे एक दखलपात्र वृत्तपत्र आणि कै. ‘के. सी.’ ही आद्याक्षरं गळून पडली आणि प्रबोधनकार ठाकरे या नावानेच ते अजरामर झाले!

वयात आल्यापासूनच प्रबोधनकारांनी लेखणी हातात धरली आणि अखेरपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर लिहितच राहिली. लोकहितवादी आणि आगरकरांच्या सामाजिक सुधारणांचा त्यांनी पाठपुरावा केला. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या समतावादी आणि आक्रमक विचारांचा यथाशक्ती प्रचार केला. महर्षि शाहू महाराजांच्या बहुजनसमाजाच्या क्रांतीत सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्योद्धाराच्या उठावात सक्रीय भाग घेतला. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या बीजरूपी कल्पनेला आपुलकीचं खतपाणी घातलं. आपल्या माफक उत्पन्नात कुटुंबाच्या किमान गरजा भागवायला न विसरता, प्रबोधनकार आपल्या लेखणीच्या आणि वाणीच्या सहाय्यानं वेगवेगळ्या सामाजिक आघाड्यांवर कायम धडधडत राहिले. वाचन, मनन, चिंतन आणि लेखनात आकंठ बुडालेल्या प्रबोधनकारांची विविध विषयांवरची ग्रंथसंपदा आणि त्यासाठी त्यांनी व्यसनी माणसाच्या आसक्तीने केलेली ग्रंथ खरेदी आणि वाचन तर थक्क होण्यासारखं आहे. त्यांची ‘जीवनगाथा’ म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींच्या माध्यमातून उलगडत जाणारा अर्वाचीन महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आहे. तर त्यांचं ‘रंगो बापूजी’ म्हणजे, भल्या भल्या इतिहासकारांनीसुद्धा अचंबित व्हावं असा मराठ्यांच्या इतिहासाच्या अखेरच्या पर्वाचा अस्सल ऐतिहासिक दस्तऐवज आहे. धर्मशास्त्रापासून समाजशास्त्रापर्यंत अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण आणि विवेचक ग्रंथ लिहिणा-या प्रबोधनकारांना मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान लाभू नये ही मोठी खेदाची बाब आहे! परंतु असले सन्मान मिळविण्यासाठी आपल्या तत्त्वांना शाब्दिक मुरडही घालण्याइतके प्रबोधनकार बोटचेपे नव्हते आणि म्हणूनच ते संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत हाच त्यांचा बहुमान आहे! अशा या चाकोरीबाह्य साहित्यकाचं समग्र साहित्य प्रकाशित करण्याच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या निर्णयाचं मनापासून अभिनंदन. एखाद्या चौकात त्यांचा पुतळा उभारण्यापेक्षाही आणि एखाद्या रस्त्याला त्यांचं नावं देण्यापेक्षाही हे प्रबोधनकारांचं उचित स्मारक ठरणार आहे. शब्दकळेचा स्वामी, पुढील पिढ्यांसाठी शब्दकळेतच उपलब्ध करणं हेच त्या शब्दकळाकाराचं भाग्य!!

प्रबोधनकारांच्या ग्रंथांचे २ खंड एव्हाना प्रकाशित झाले आहेत. प्रस्तुतचा हा तिसरा खंड त्यांच्या नाटकांचा. ह्या नाट्यखंडाची प्रस्तावना मी लिहावी, असा प्रस्ताव प्रबोधनकारांचे एक भाविक कल्याणशिष्य आणि या संपादक समितीचे निमंत्रक ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक श्री. पंढरीनाथ सावंत यांनी माझ्यासमोर ठेवला आणि मी ताडमाड उडालोच. ‘इये मराठीचिये नगरी’ प्रस्तावनेला खूप महत्त्व आहे. अनेक ग्रंथांच्या प्रस्तावना मूळ ग्रंथापेक्षाही सरस उतरल्या आहेत आणि अनेक साहित्यिक त्यांच्या मौलिक ग्रंथापेक्षाही त्यांनी इतरांच्या ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावनांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत. या मालिकेत प्रकाशीत झालेल्या प्रबोधनकारांच्या चरित्रग्रंथाला कै. धनंजय कीर या ख्यातकीर्त चरित्रलेखकाची तर रंगो बापूजी या इतिहास ग्रंथाला डॉ अ. रा. कुलकर्णी या जानेमाने इतिहासतज्ञाची प्रस्तावना लाभली आहे. याच न्यायाने नाटकांच्या खंडाला नाटक्याची प्रस्तावना म्हणून माझी निवड करण्यात आली असली तरी मी शब्दगंगेच्या पलीकडच्या तीरावरचा प्रवासी आहे हे ध्यानात घेणं आवश्यक आहे. निमिर्तीच्या आणि भूमिकेच्या दृष्टीने

संदर्भ प्रकार: