वेबसाईट कशासाठी

प्रबोधनकार डॉट कॉम कशासाठी?

आजच्या महाराष्ट्राचा पाया गेल्या शतकात घातला गेला. तेव्हा महाराष्ट्राला वळण लावणा-यांमधे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेंचं नाव खूप वरचं आहे. पण ज्यांना ते प्रबोधनकार म्हणून भावले, त्यांना ठाकरे नावाची ऍलर्जी होती. तर ठाकरे म्हणून त्यांच्या प्रेमात पडणा-यांना, प्रबोधनकार असण्याचा विटाळ होता. त्यामुळे प्रबोधनकार कायम दुर्लक्षित राहिले.

आज त्यांच्या नावाने बागा बांधल्या जात आहेत, थिएटरं सुरू होत आहेत, रस्ते बांधले जात आहेत आणि चौक सजत आहेत. पण त्यांची चार चांगली पुस्तकं कुणाला वाचायची असलीत, तर उपलब्ध नाहीत, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नक्कीच नाही.

प्रबोधनकारांचे विचार आजही ताजेतवाने आहेत. त्यांचं संघर्षाने भरलेलं जीवन तर प्रेरणेचा अखंड प्रवाह आहे. विचारवंत, लेखक, इतिहाससंशोधक, पत्रकार, शिक्षक, वक्ते, नेते, चळवळे, फोटोग्राफर, संगीततज्ज्ञ, समाजसुधारक, धर्मसुधारक असे चहुअंगाने विकसित झालेले ते बहुढंगी वटवृक्षच होते. भिक्षुकशाहीच्या चिंधड्या उडवण्यापासून ते समर्थ रामदारांचं इंग्रजी चरित्र लिहिण्यापर्यंत आणि नाटक, पोवाड्यांपासून वैदिक विवाहविधीच्या संपादनापर्यंत त्यांची प्रतिभा स्वतंत्र विहार करत राहते. त्यामुळे आजच्या ठराविक वादांच्या चौकटीत बसवता येत नाही.

प्रबोधनकारांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा सगळा पसारा तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. त्यासाठीची विद्वत्ता आणि अभ्यास आमचा नाही.

आमच्याकडे आहे ते फक्त प्रबोधनकारांबद्दलची कृतज्ञता आणि आपल्या कामाविषयीचा प्रामाणिकपणा. याच दोन गोष्टींमुळे आम्ही हे धाडस करू शकलो. त्यामुळे यात अनेक त्रुटी राहिल्या. अधिक संशोधनाच्या जागा रिकाम्या आहेत. पण लवकरच हे दूर होईल, असा आम्ही प्रयत्न करत राहू. रिलाँचिंगच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने आम्ही ही धडपड करत आहोत.

आज अभ्याससंदर्भांचा सगळा शोध इंटरनेटच्या सर्चपाशी येऊन थांबतो. या नव्या माध्यमात फक्त प्रबोधनकारच नाहीत, तर महाराष्ट्राच्या अनेक दिग्गजांना काहीच जागा नाहीय. आज हे स्थान मिळवून देणं ही काळाची गरज आहे. केवळ या महापुरुषांचं काम आणि विचार तरुणांपर्यंत पोहोचावेत म्हणून नाही, तर इंटरनेटच्या महाजालात मराठीला, म्हणजेच मराठी संस्कृतीला ताठ मानेनं उभं करण्यासाठी हे करणं गरजेचं आहे.

प्रबोधनकार डॉट कॉम हा या साखळीतला पहिला प्रयत्न आहे. महाराष्ट्राचं कर्तृत्व नव्या महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी ही धडपड सुरू आहे. त्यातलं काही उचलावं की उचलू नये, हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण निदान आम्हाला ते कुठे मिळणार वाचायला, असं म्हणून कुणाला पळवाट काढता येऊ नये, इतकं काम करण्याची आमची इच्छा आहे. आपला वारसा किती भव्य आहे, हे कळलं तरच आज मराठी मनोवृत्तीला डसलेले न्यूनगंड कदाचित दूर होऊ शकतील, या अपेक्षेत आमचा हा प्रयत्न महाराष्ट्राच्या जनता जनार्दनाच्या सेवेत अर्पण करत आहोत.

शिवाय या प्रकल्पात शेकडो हातांनी मदत करणा-या अनेक मान्यवरांचे आणि मित्रांचे मनापासून आभार. 

सचिन परब,

संपादक, प्रबोधनकार